Shiva Fame Actor Bless With Baby Girl : छोट्या पडद्यावरील ‘शिवा’ ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. २०२४ मधील फेब्रुवारी महिन्यात ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर आता जवळपास दीड वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता ही मालिका निरोप घेणार आहे. मालिका संपत असल्यामुळे अनेक कलाकार त्यांच्या भावुक प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

अशातच ‘शिवा’ मालिकेमधील एका अभिनेत्याने आनंदाची बातमी दिली आहे, ती म्हणजे अभिनेता बाबा झाला आहे. त्याने स्वत: याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत माहिती दिली आहे. ‘शिवा’ मालिकेमध्ये लक्ष्मण देसाई ही भूमिका साकारणारा अभिनेता सुनील तांबट बाबा झाला आहे. अभिनेत्याला कन्यारत्न प्राप्त झाले आहे आणि ही आनंदाची बातमी त्याने सोशल मीडियावर एक खास पोस्टद्वारे दिली आहे.

सुनील व त्याची पत्नी प्रतिमा दातार दोघे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे ते त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच दोघांनी मिळून चाहत्यांना आई-बाबा झाल्याची गुडन्यू ज सांगितली आहे. दोघांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये प्रतिमाचा डोहाळजेवणाचा लूक पाहायला मिळत आहे. तर त्यांच्या लेकीच्या छोटासा पायही दिसत आहे.

या पोस्टवर त्यांनी “आमच्या आनंदाचा बॉक्स अखेर उघडला गेलाय” असं लिहिलं आहे, तर “आमच्या खऱ्या आयुष्यातील भूमिका आता बदलल्या आहेत. आम्ही एका गोंडस मुलीचे आई-वडील झालोय”, असे म्हणत त्यांनी आई-बाबा झाल्याचा आनंद शेअर केला आहे. दरम्यान, दोघांनी ही आनंदाची बातमी देताच मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.

सुनील आणि प्रतिमाने शेअर केलेल्या या पोस्टखाली अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मालिकेतील शिवा म्हणजेच अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने ‘अय्यो’ म्हणत भावूक इमोजी शेअर केल्या आहेत. अमृता पवार, ऐश्वर्या नारकर, पूजा कातुर्डे, ऋतुजा बागवे यांसह अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत आणि अभिनेत्याचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, सुनील तांबट हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कलाकार आहे. त्याने कलर्स मराठीवरील ‘योग योगेश्वर जय शंकर’ मालिकेत काम केले आहे. तसेच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेतही तो दिसला आहे. सध्या त्याचे रंगभूमीवर ‘२१७ पद्मिनी धाम’ हे नाटकही सुरू आहे. तसेच तो ‘शिवा’ मालिकेतही पाहायला मिळाला.