Shiva Serial Fame Actress Ganpati Making Video : संपूर्ण महाराष्ट्रात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. यंदाचा गणेशोत्सव आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षी सेलिब्रिटीही मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करतात. या गणेशोत्सवानिमित्त अनेक कलाकार मंडळी घरीच स्वतःच्या हाताने गणरायाची मूर्ती बनवतात.

बॉलीवूडसह मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान होतात. आपल्या घरातील बाप्पाची मूर्ती अनेक कलाकार स्वत: घडवतात. अनेक मराठी कलाकार आपल्या घरातील गणपतीची मूर्ती स्वत: साकारतात. अशातच एका मराठी अभिनेत्रीने तिच्या घरच्या बाप्पाची मूर्ती साकारली आहे.

झी मराठीवरील ‘शिवा’ मालिकेमधील अभिनेत्री मानसी सुरेशने घरच्या बाप्पाची मूर्ती साकारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यासह तिने बाप्पाची मूर्ती साकारतानाचा अनुभवही शेअर केला आहे. या व्हिडीओखालील कॅप्शनमध्ये ती म्हणते, “मातीच्या प्रत्येक कणात साचलेली भक्तीची भावना, स्वतःच्या हातांनी बाप्पाला घडवत असताना झालेला आनंद आणि हृदयातील उत्साह… मी केलेला एक छोटासा प्रयत्न.”

मानसीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत तिचं कौतुक केलं आहे. “गणपती बाप्पा मोरया”, “तुम्ही अभिनय जितका छान करता तितकाच मूर्ती बनवतानाचा प्रयत्न सुद्धा छान केला आहे”, खूपच सुंदर मूर्ती बनवली आहेस”, “स्वत:च्या हाताने बाप्पा साकारतानाची मज्जा काही औरच” या आणि अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

मानसीने शिवा या मालिकेत किर्ती ही भूमिका साकारली होती. मालिकेत तिची नकारात्मक भूमिका आहे. या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र मालिका संपल्यानंतरही अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.

‘शिवा’ मालिकेआधी मानसी स्टार प्रवाहवरील ‘स्वाभिमान’ या मालिकेत पाहायला मिळाली आहे. या मालिकेतील तिची भूमिका अनेकांच्याच पसंतीस पडली होती. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी मानसी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच तिने गणपती साकारतानाचा व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे.