Shivani Sonar’s Husband Reaction On Tarini Serial : झी मराठी वाहिनीवर दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची मुख्य भूमिका असलेली ‘वीण दोघांतली तुटेना’ आणि दुसरी म्हणजे शिवानी सोनार आणि स्वराज नागरगोजे यांची ‘तारिणी’.
गेल्या काही दिवसांपासून या मालिकांच्या चर्चा आहेत. अशातच आजपासून म्हणजेच ११ ऑगस्टपासून या दोन्ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दरम्यान, तारिणी मालिकेच्या प्रमोशननिमित्ताने शिवानीने नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवानीने तिच्या या मालिकेचा अनुभव सांगितला.
राजश्री मराठी शोबझला दिलेल्या मुलाखतीत शिवानी म्हणाली, “खांद्याला दुखापत झाली आहे. पण ठीक आहे. हळूहळू रिकव्हर होत आहे. पोस्टर समोर आल्यापासूनच अनेकांनी कौतुकाचे मॅसेज केले. त्यात टेलिव्हिजन क्षेत्रात ही अशी भूमिका करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मला इंडस्ट्रीमधील अनेकांनी सांगितलं की हे तू करू शकतेस. आपल्याला कधी कधी जमेल की नाही वाटत नाही. पण इतरांना ते नेहमीच वाटतं. पहिल्या प्रोमोनंतरही मला अनेकांनी सांगितलं की, तुझी कास्टिंग अगदी योग्य झाली आहे आणि ही खूप मोठी कौतुकाची थाप आहे.”
यानंतर शिवानी सांगते, “जेव्हा एखाद्या मालिकेतल्या भूमिकेच्या नावाने तुम्हाला हाक मारली जाते. तेव्हा तुम्ही जग जिंकलेलं असतं, असं मला तरी वाटतं. ‘तारिणी’बाबत असं झालं आहे की, प्रोमोनंतरच अनेकजण तारिणी… तारिणी… अशी हाक मारत आहेत. त्यामुळे ही भावना खूपच छान आहे.”
यानंतर तिने ऑडिशनची आठवण सांगताना म्हटलं, “या मालिकेसाठीची ऑडिशन अगदी सोपी झाली होती. फक्त काहीतरी अॅक्शन सीन करून दाखवा म्हणाले होते. त्यामुळे मी लाथ मारली होती. बाकी काही विशेष नाही. त्यामुळे मी काही कमाल केली नाही. जे काय ते पायानेच केलं.”
पुढे शिवानीने ‘तारिणी’च्या प्रोमोवर नवरा अंबर गणपुळेची काय प्रतिक्रिया होती? याबद्दल म्हटलं की, “अंबरची खूप छान प्रतिक्रिया होती. तो माझा खूप चोखंदळ प्रेक्षक आहे. ‘तारिणी’च्या प्रोमोवर त्याची बापरे… एकदम धतिंग शूटिंग करत आहेस तू… अशी प्रतिक्रिया होती. त्याला प्रोमो खूप आवडला. जे काही करशील ते छान कर. पण सांभाळून कर असा म्हणाला. तो यासाठी खूपच उत्सुक आहे. तोच नव्हे तर माझी आई, माझ्या सासूबाईसुद्धा या मालिकेसाठी उत्सुक आहेत. नऊवारी साडीत अॅक्शन सीन्स दिसणार आहेत. त्यामुळे कुटुंबातील सगळेच आनंदी आणि खूपच उत्सुक आहेत.”