Adhokshaj Karhade on Shubhangi Gokhale: अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा नुकताच ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विविध कलाकार जोडपी या शोमध्ये हजेरी लावताना दिसतात. तसेच, कुटुंब कीर्रतन या नाटाकामुळेदेखील अनेकदा चर्चेत असतो.

अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे सध्या’ कमळी’ या मालिकेत काम करताना दिसत आहे. या दोन्ही भावांच्या कामाचे वेळोवेळी कौतुक होताना दिसते.

आता अभिनेता अधोक्षज कऱ्हाडेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने शुभांगी गोखलेविषयी प्रेम व्यक्त केले आहे, तसेच त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. रक्षाबंधनच्या निमित्ताने या दोन्ही भावांसाठी शुभांगी गोखलेंनी सुंदर वस्तू भेट दिली आहे. तसेच, एक छोटेसे पत्रही लिहिले आहे.

अभिनेता काय म्हणाला?

अभिनेत्याने काही फोटो शेअर करत लिहिले, “लहानपणापासून शुभांगी गोखलेंचं काम पाहत असताना त्यांच्या रूपात आम्हाला एक लाडकी बहीण मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. पण ‘साखर खाल्लेला माणूस’च्या निमित्तानं त्यांच्याशी ओळख झाली आणि शुभांगी गोखलेंच्या ‘शुभांगीताई’ झाल्या.

पुढे अधोक्षज कऱ्हाडेने लिहिले, “तेव्हापासून एकाही राखीपोर्णिमेला त्यांची राखी आली नाही असं झालं नाही. राखी मिळाल्यावर बहिणीची ओवाळणी खरंतर आम्ही द्यायची.पण, राखीशिवाय प्रत्येक वर्षी कुठून तरी खास शोधून काढलेलं त्यांच्या स्टाईलचं एक युनिक गिफ्टसुद्धा त्यांच्याकडूनच मिळतं. एवढंच नाही, प्रत्येक गिफ्टबरोबर त्यांनी लिहिलेल्या छोट्याशा संदेशातसुद्धा त्यांचं आमच्यावरचं प्रेम जाणवतं.”

“हा एकदम फंकी शर्ट आणि हे कलरफुल बास्केट हे यावर्षीचं आमचं गिफ्ट आहे. अशाच दोन भेटवस्तू संकर्षणसाठी सुद्धा आहेत. त्याला प्रयोगाला आणि मला शूटिंगसाठी डबा न्यायला म्हणून विचारपूर्वक दिलेलं गिफ्ट आहे. शुभांगी ताई, खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार”, असे म्हणत अभिनेत्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्याने शुभांगी गोखलेंनी दिलेली बास्केट आणि त्यांनी लिहिलेला चिठ्ठीचा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, शुभांगी गोखले या त्यांच्या अभिनयासाठी ओळखल्या जातात. चित्रपट, हिंदी मराठी मालिका, नाटक या तिन्ही माध्यमात काम करत त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली आहे. ‘असेन मी नसेन मी’ या नाटाकतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येतात.