छोट्या पडद्यावर एकापेक्षा एक भूमिका साकारत अभिनेत्री श्वेता तिवारीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. ‘कसौटी जिंदगी की’ ही तिची मालिका लोकप्रिय ठरली होती. तिला या मालिकेतून मोठी प्रसिद्धी मिळाली.
अभिनेत्री तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळे, तसेच तिच्या वक्तव्यांमुळेदेखील मोठ्या चर्चेत असते. नुकतीच अभिनेत्रीने भारती टीव्ही या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने पालकत्व, शिस्त, मुलांचे करिअर तसेच त्यांच्या पैशांची गुंतवणूक याबद्दल वक्तव्य केले.
श्वेता तिवारी काय म्हणाली?
मुलीला एकटीने वाढवताना तिने कोणती काळजी घेतली, तिला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला का, याबद्दल अभिनेत्री म्हणाली, “मी फार कडक शिस्तीत मुलांना वाढवले नाही, पण घरात काही नियम होते. जर पलकने मला सांगितले की ती पार्टीमधून रात्री एक वाजता घरी पोहोचणार आहे, तर १ वाजता पोहोचणार आहे, म्हणजे त्यावेळी तिने घराच्या दरावाजापाशी असायला हवे.”
मुलीच्या सुरक्षेचा विचार करून श्वेताने पलकच्या मैत्रिणींचे आणि त्यांच्या पालकांचे फोन नंबर घेऊन ठेवले होते. मी तिला सांगितले होते की, मी त्यांना तोपर्यंत फोन करणार नाही, जोपर्यंत तुझा फोन बंद लागत नाही. पण, माझं तिच्याशी किंवा तिच्या मैत्रिणींशी बोलणं झालं नाही तर मी तिच्या मैत्रिणींच्या पालकांना फोन करायचे. कारण त्यांना ड्रायव्हर्सचे नंबर माहीत असायचे. मी काळजीत असायचे, कारण ती मुलगी आहे आणि समाज थोडा विचित्र आहे. तिचे शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिला फोन दिला नव्हता, असेही तिने सांगितले.
श्वेताने असेही सांगितले की, पलकला एक बजेट दिले होते. ती महिन्याला २५ हजार खर्च करू शकत असे. पण, समजा तिने ३० हजार खर्च केले तर तिला घरातील कामे करावी लागत असत आणि त्यातून तिला पैसै मिळवावे लागत असत. उदाहरणार्थ, तिचे बाथरुम साफ करण्याचे तिला १००० रुपये मिळत असे. बेड नीट ठेवण्याचे तिला ५०० रुपये मिळत, भांडी स्वच्छ करण्यासाठी १ हजार रुपये मिळत.
आता पलक अभिनय क्षेत्रात काम करताना दिसत आहे. नुकतेच तिने भूतनी या चित्रपटात काम केले आहे. मात्र, पलकचे आर्थिक व्यवहार श्वेताच सांभाळत असल्याचा अभिनेत्रीने खुलासा केला. श्वेता म्हणाली की, मी तिचे अधिकतर पैसे गुंतवते. थोडेच पैसे मी तिच्या अकाउंटमध्ये ठेवते. कधीकधी गमतीने पलक म्हणते की तू मला कंगाल केले आहेस. माझे सगळे पैसे काढून घेतेले आहेस. पण, मी तिला समाजावून सांगते की ती आता ज्या प्रकारे गुंतवणूक करत आहे, सध्या तसे कोणीही करत नाही.”
दरम्यान, श्वेता तिवारी आणि तिची मुलगी पलक तिवारी आगामी काळात कोणत्या चित्रपटात काम करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.