मनोरंजनसृष्टीतील कलाकार विविध कारणांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतात. मोठ्या पडद्यावर किंवा मालिकेत दिसणारे हे कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातील अनेक खास गोष्टी शेअर करीत असतात. वाढदिवस, लग्न, सेटवरील गमतीजमती, विविध ठिकाणचे फोटो व्हिडीओ हे कलाकार शेअर करीत असतात. काही दिवसांपासून अभिनेत्री दिव्या पुगावकर(Divya Pugaonkar) ची लगीनघाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आता या सगळ्यात अभिनेता सिद्धार्थ खिरीड(Siddhart Khirid)ने सोशल मीडियावर दिव्याच्या संगीत सोहळ्यातील शेअर केलेला व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे.

‘मुलगी झाली हो’मधील कलाकारांचा खास अंदाज

सिद्धार्थ खिरीडने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ दिव्या पुगावकरच्या संगीत सोहळ्यातील आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, सिद्धार्थसह ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील इतर कलाकारांनी दिव्याच्या संगीत सोहळ्यात हजेरी लावली आहे. ते सर्व प्रेमाने दिव्याला स्टेजवर घेऊन जातात. हे कलाकार स्टेजवर जात असताना ‘मुलगी झाली हो’चे शीर्षकगीत ऐकायला मिळत आहे. दिव्या, सिद्धार्थ, शर्वाणी पिल्लई, स्नेहलता, सृजन हे सर्व मुलगी झाली हो या मालिकेच्या शीर्षकगीतावर डान्स करताना दिसत आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सिद्धार्थने, ‘आपल्या माऊचं संगीत’, अशी कॅप्शन दिली आहे. सिद्धार्थने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे.

मुलगी झाली हो या मालिकेत दिव्या पुगावकर प्रमुख भूमिकेत दिसली होती. शर्वाणी पिल्लईने तिच्या आईची भूमिका निभावली होती. तर, सिद्धार्थ खिरीडदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. योगेश सोहोनी हा अभिनेता या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसला होता. या मालिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाल्याचे पाहायला मिळाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपासून दिव्या तिच्या लग्नाच्या विविध कार्यक्रमांमुळे चर्चेत आहे. केळवण, मेंदी, हळदीच्या कार्यक्रमातील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दिव्याच्या खासगी आयुष्याबरोबरच अभिनेत्री तिच्या कामामुळेदेखील मोठ्या चर्चेत आहे. लक्ष्मी निवास या मालिकेत तिने जान्हवी ही भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेत नुकतेच जान्हवी व जयंतचे लग्न झाले असून, त्यांच्या संसाराला सुरुवात झाली आहे. आता मालिकेत ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहे.