दिल्लीतील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाने कडक पावले उचलली आहेत. न्यायालयाने सर्व भटके कुत्रे पकडून आश्रयस्थानांमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशाला अनेकांकडून कडाडून विरोध होत आहे. सोशल मीडियावरही या निर्णयाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बॉलीवूडसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी या निर्णयाला विरोध केला आहे.

अनेक कलाकारांकडून सोशल मीडियावर न्यायालयाच्या निर्णयाविरुद्धच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. तसंच या मुक्या जनावरांसाठी काळजी व्यक्त केली आहे. अशातच एका गायकाने मात्र न्यायालयाच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. तसंच ‘भटक्या कुत्र्यांवर जर इतकं प्रेम आहे, तर त्यांना आपल्या घरी घेऊन जा’ असा टोलाही त्याने लगावला आहे, हा गायक म्हणजे राहुल वैद्य.

राहुल वैद्य हा लोकप्रिय गायक सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सोशल मीडियाद्वारे तो त्याची मतं स्पष्टपणे व्यक्त करताना दिसतो. अशातच त्याने भटक्या श्वनांच्या न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राहुलने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे आणि या स्टोरीद्वारे तो म्हणतो, “माझं कुत्र्यांवर खूप प्रेम आहे, पण गांधीजींनी म्हटलं होतं – ‘भटके कुत्रे हे समाजाच्या बेपर्वाईचं लक्षण आहे, करुणेचं नाही. माझ्यावर २०२१ मध्ये एका भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता. हा कुत्रा एका अभिनेत्याने ‘पाळलेला’ असला, तरी तो प्रत्यक्षात भटक्या कुत्र्यांपैकीच एक होता. त्या इमारतीतल्या मुलांशी बोलल्यानंतर कळालं की, तो कुत्रा अनेकांना चावतो.”

यापुढे राहुल दुसऱ्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे म्हणतो, “भटक्या कुत्र्यांवर जर तुमचं इतकं प्रेम आहे, तर त्यांना घरी घेऊन जा. फक्त सोशल मीडियावर स्टोरीज टाकून आणि न्यायालयाच्या निर्णयावर टीका करून काहीच साध्य होणार नाही. प्राणीप्रेम किंवा करुणा या विषयांचा या मुद्द्याशी काहीही संबंध नाही.”

यानंतर त्याने स्पष्टपणे असं म्हटलं, “भावनांमध्ये वाहून न जाता, आपण याकडे एक गंभीर समस्या म्हणून पाहायला हवं. जी योग्य प्रकारे हाताळणं गरजेचं आहे.” यापुढे तो म्हणतो, “माझा शेवटचा प्रश्न: जर तुमच्या आई-वडिलांना किंवा मुलांना भटक्या कुत्र्यांनी चावलं, तरीही तुमचं मत असंच राहील का?”