Sonyaa Ayoddhya reacts on Divorce : ‘कसौटी जिंदगी की २’ फेम अभिनेत्री सोन्या अयोध्याचा घटस्फोट झाला आहे. सोन्याचं ५ वर्षांचं लग्न मोडलं आहे. सोन्याने पती हर्ष समोर्रेपासून अधिकृतपणे घटस्फोट घेतला आहे. सोन्याने स्वतः तिच्या घटस्फोटाची पुष्टी केली आहे. मागच्या महिन्यात घटस्फोट झाल्याचं तिने सांगितलं.
सोन्याने उद्योजक हर्ष समोर्रेशी १२ डिसेंबर २०१९ रोजी जयपूरमध्ये एका भव्य सोहळ्यात लग्न केलं होतं. सान्या व हर्ष यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं, तेव्हापासूनच या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू होत्या. नंतर त्यांनी एकमेकांना अनफॉलो केलं. आणि काही दिवसांपूर्वी त्यांच्या घटस्फोटाची बातमी आली. घटस्फोटाच्या भावनिक परिणामांबद्दल सोन्या व्यक्त झाली आहे.
घटस्फोटाबद्दल सोन्या म्हणाली…
इ-टाइम्सशी बोलताना सोन्या म्हणाली, “घटस्फोट खूपच त्रासदायक असतो. माझ्याबरोबर असं काही घडेल असं मला कधीच वाटलं नव्हते. मी नात्यातल्या संघर्षापेक्षा शांतता निवडली. आता मी स्वतःला वेळ देतेय कारण मला घटस्फोट व त्यासंबंधित गोष्टींना जास्त वेळ द्यायचा नाही. मी नव्या गोष्टी शिकतेय आणि आयुष्यात पुढे जातेय.”
नात्यात नेमकं काय बिनसलं?
लग्नात नेमकी काय चूक झाली, असं विचारल्यावर सोन्या म्हणाली, “कोणतंही नातं फक्त एका व्यक्तीने प्रयत्न केल्याने टिकत नाही, दोघांचेही प्रयत्न महत्त्वाचे असतात. तरच वैवाहिक जीवनात संतुलन राहतं.” सोन्याने घटस्फोटाबद्दल जास्त बोलणं टाळलं. पण ५ वर्षांचं नातं संपल्याचा तिच्यावर मोठा परिणाम झाला आहे. २९ सोन्याने अवघ्या २४ व्या वर्षी लग्न केलं होतं. आता या घटस्फोटातून सावरून आयुष्यात पुढे जात असल्याचं सोन्याने नमूद केलं.
“मी माझ्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं आहे आणि विविध माध्यमांमध्ये काही रंजक भूमिका साकारण्याचा विचार करत आहे. मला टीव्हीवर रंजक भूमिका करायच्या आहेत. मला ओटीटी शोमध्ये काम करून फार आनंद होतोय. मला वाटतं की गेल्या काही वर्षांत ओटीटी शोमध्ये महिलांसाठी चांगल्या भूमिका येत आहेत. टीव्हीवर ‘कसौटी जिंदगी २’ की मालिकेत माझी महत्त्वाची भूमिका होती, तर ‘नजर’मध्ये माझी भूमिका अधिक कमकुवत होती. येत्या काळात मला वेगवेगळ्या भूमिका करायच्या आहेत,” असं सोन्या म्हणाली.
सोन्या अयोध्या ‘शक्ती’, ‘सिर्फ तुम’, ‘संजोग’, ‘नजर’ आणि ‘कसौटी जिंदगी २’ सारख्या टीव्ही शो व्यतिरिक्त, ‘किल दिल’ आणि ‘फु से फॅन्टसी’ सारख्या वेब सीरीजमध्ये झळकली आहे.