Rupali Bhosale Lapandav Serial : स्टार प्रवाहच्या ‘लपंडाव’ मालिकेत प्रेक्षकांना काही दिवसांपूर्वीच एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. सरकार आपल्या मुलीशी इतकं वाईट का वागते असा प्रश्न ही मालिका सुरू झाल्यापासून प्रत्येकाला पडला होता. मात्र, सरकार ही सखीची खरी आई नसल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. खऱ्या तेजस्विनीला सरकारने म्हणजेच मनस्विनीने आपल्या ताब्यात ठेवलेलं असतं. रुपाली भोसले सध्या मालिकेत तेजस्विनी ( सखीची खरी आई ) व मनस्विनी ( सरकार ) अशा दोन भूमिका साकारत आहे.
सखीची खरी आई गेली कित्येक वर्षे मनस्विनीच्या ताब्यात असते. याचा उलगडा नुकताच मालिकेत करण्यात आला. ‘लपंडाव’ मालिकेचा हा विशेष भाग प्रत्येकाला आवडला. मात्र, ही दुहेरी भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री रुपाली भोसलेने प्रचंड मेहनत घेतली होती. विशेष म्हणजे तिला एकाच दिवशी तब्बल ५ वेगवेगळ्या लूक्समध्ये तयार होऊन शूट करायचं होतं.
रुपालीचे ५ वेगवेगळे लूक्स कोणते होते आणि अभिनेत्रीने यासाठी कशी तयारी केली याबद्दल रुपाली भोसलेने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
रुपाली भोसले लिहिते, “अशक्य ते शक्य! एकाच दिवशी पाच वेगवेगळे लूक्स शूट करणं म्हणजे खरंच एका वेगळ्या प्रवासातून जाण्यासारखं होतं. एक कलाकार म्हणून अशा क्षणी जाणवतं की, मी हे काम इतकं का प्रेमाने करते? थकवा होतो? हो… पण हा थकवा मनाला पूर्णपणे समाधान देणारा असतो. प्रत्येक लूक, प्रत्येक फ्रेम, प्रत्येक भावना सगळ्यासाठी खूप मेहनत घेतली. प्रत्येक लूकसाठी नव्याने तयार करावी लागली आणि ही संधी मिळाल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. माझी संपूर्ण टीम… मेकअप आर्टिस्ट, हेअर डिपार्टमेंट, स्टायलिस्ट, ADs, लेखक, क्रिएटिव टीम, दिग्दर्शक, DOP, निर्माते, स्टार प्रवाहची संपूर्ण टीम आणि या सगळ्या पात्रांवर आणि कलाकार म्हणून माझ्यावर भरभरून प्रेम करणारे मायबाप प्रेक्षक! तुमच्या पाठिंब्याशिवाय हे शक्यच नव्हतं. माझ्यावर विश्वास ठेवून मला प्रत्येकवेळी माझं सर्वोत्तम देण्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल खूप प्रेम. आज सेटवर उभं राहून, एका पात्रातून दुसऱ्यात जाताना, मनात एकच भावना होती…. कृतज्ञता! या प्रवासासाठी, या संधींसाठी आणि यामागे उभ्या असलेल्या प्रत्येकाला सलाम! प्रत्येक व्यक्तीची मेहनत यामागे होती… शब्दांच्या पलीकडे कृतज्ञ. LOVE YOU ALL विठ्ठल सर, सोमनाथ, आशु, आकाश, डीओपी भरतजी आणि त्यांची टीम”
दरम्यान, रुपालीने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “खरंच तुम्हाला सॅल्युट आहे”, “मस्त व्हिडीओ बनवला मॅडम तुमची मेहनत फळाला आली”, “याला म्हणतात डेडीकेशन” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
