Star Pravah Muramba Fame Actress Shivani Mundhekar : विविध मराठी मालिका महाराष्ट्राच्या घराघरांत पाहिल्या जातात. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी या मालिकांमध्ये नेहमीच हटके ट्विस्ट आणले जातात. अनेकदा कलाकारांना थरारक सीन्स सुद्धा शूट करावे लागतात तर, काही कलाकार शूटिंगच्या निमित्ताने डान्स, तलवारबाजी, गाडी चालवणं अशा नवनवीन गोष्टी शिकून घेतात. असाच काहीसा अनुभव ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत काम करणाऱ्या मुख्य नायिकेने प्रेक्षकांना सांगितला आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर दुपारच्या सत्रात ‘मुरांबा’ ही मालिका प्रसारित केली जाते. गेली ३ वर्षे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेत लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर ( अक्षय ) व अभिनेत्री शिवानी मुंढेकर ( रमा ) यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सध्या रमा-अक्षयच्या गोड संसारात माहीची एन्ट्री झाल्याचं मालिकेत पाहायला मिळत आहे.
माही हुबेहूब रमासारखी दिसत असते. खरंतर, सुरुवातीला रमाचा अपघात झाल्याने अक्षयची आईच माहीला घरी आणते पण, दुसरीकडे रमा देखील जिवंत असते. माही हळुहळू सगळ्या गोष्टींचा गैरफायदा घेते आणि आता ती अक्षयवरचा हक्क सोडण्यास देखील तयार नाहीये. या मालिकेत काही दिवसांपूर्वीच रमा आणि माही आमनेसामने आल्याचा जबरदस्त सीन पाहायला मिळाला होता.
“माही गाडी चालवत असते…इतक्यात रमा तिच्यासमोर येऊन उभी राहते. रमा न घाबरता माहीच्या ओव्हर स्पीडने येणाऱ्या गाडीसमोर स्तब्ध उभी राहते आणि नंतर मी मरणाला घाबरत नाही असं माहीला सांगते” असा जबरदस्त सीन मालिकेत पाहायला मिळाला होता.
मालिकेत रमा आणि माही ही दोन हुबेहूब दिसणारी पात्र असली तरीही, खऱ्या आयुष्यात अभिनेत्री शिवानी मुंढेकरच या दोन्ही भूमिका साकारत आहे. हा सीन शूट करताना शिवानीपुढे गाडी चालवण्याचं आव्हान होतं कारण, तिला गाडी चालवता येत नाही. शेवटी मग मालिकेच्या टीमने तिला केवळ ड्रायव्हिंग सीटवर बसायला सांगून अभिनय करायला सांगितला. बाकीची टीम यावेळी मागून शिवानीच्या गाडीला धक्का मारत होती. अशाचप्रकारे गाडीला मागून धक्का मारून हा सीन शूट करण्यात आला. याचा BTS व्हिडीओ अभिनेत्रीने युट्यूबवर शेअर केला आहे.
“हाय…आज आम्ही एक सीन शूट करणार आहोत. ज्यात मला गाडी चालवायची आहे. खरंतर मला गाडी चालवता येत नाही.” असं शिवानी या व्हिडीओच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना सांगते. संपूर्ण टीमने मेहनत घेतल्यावर या सीनचं शूटिंग पूर्ण करण्यात आलं त्यामुळे शेवटी अभिनेत्रीने सर्वांचे आभार मानले.
शूट झालेला प्रोमो
दरम्यान, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर अभिनेत्री शिवानी मुंढेकरची ‘मुरांबा’ ही लोकप्रिय मालिका दुपारी दीड वाजता प्रसारित केली जाते.