Star Pravah New Show Shitti Vajali Re : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर लवकरच एक नवीन शो सुरू होणार आहे. या कार्यक्रमाचं नाव आहे ‘शिट्टी वाजली रे’. हा कार्यक्रम नेमका कसा आहे? यामध्ये कोण-कोण झळकणार याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात…

‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमाचं वेगळेपण म्हणजे या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांना चविष्ट पदार्थ बनवण्याचा टास्क दिला जाणार आहे. मात्र, हे पदार्थ बनवताना कलाकारांची कशी तारांबळ उडते हे पाहणं मजेशीर ठरणार आहे. कारण, कलाकारांचं कलाकौशल्य आपण मालिका, नाटक आणि सिनेमांमधून पाहतच असतो. पण, त्यांचं आजवर कधीही न पाहिलेलं पाककौशल्य ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमाच्या मंचावरून पहिल्यांदाच महाराष्ट्रासमोर येणार आहे.

सहजरित्या आपल्या अभिनयाने मन जिंकणारे हे कलाकार स्वयंपाकात खरंच कुशल आहेत का? याची पोलखोल ‘शिट्टी वाजली रे’चा मंच करणार आहे. थोडक्यात काय, पोटभर खायला घालणाऱ्या नाहीतर स्वयंपाक करता-करता पोटभर हसवणाऱ्या कलाकार जोडीचा शोध हा कार्यक्रम घेणार आहे. लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ हा कार्यक्रम होस्ट करणार असून पूर्णब्रह्म या मराठी रेस्टॉरंटच्या संचालिका जयंती कठाळे सेलिब्रिटी शेफची भूमिका पार पाडतील.

या भन्नाट कार्यक्रमात निक्की तांबोळी, विजय पाटकर, आशिष पाटील, प्रियदर्शन जाधव, माधुरी पवार, संकेत पाठक असे अनेक कलाकार सहभागी होणार आहेत. त्यामुळे पोटभर हसायचं असेल तर ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमाचा एकही भाग चुकवू नका.

‘शिट्टी वाजली रे’ हा कार्यक्रम येत्या २६ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. नेटकऱ्यांनी या शोचा प्रोमो पाहताच कौतुकाचा वर्षाव केला आहे. मराठीत पहिल्यांदाच हा आगळावेगळा कार्यक्रम येणार असल्याने सगळेच हा शो पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’ गाजवल्यावर निक्की तांबोळी आता ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे निक्कीच्या चाहत्यांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे. आता या शोमध्ये निक्की प्रेक्षकांचं मनोरंजन कसं करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.