अभिनेता शशांक केतकर व अभिनेत्री शिवानी मुंढेकर यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘मुरांबा’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. चार वर्षांपासून ही मालिका सुरू असून, यामध्ये नेहमी काही न काही ट्विस्ट येत असतात. काही दिवसांपासून मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री शिवानी मुढेकर ही मालिकेत रमा व माही अशा दोन भूमिका साकारताना दिसतेय.
काही दिवसांपासून यामध्ये माही अक्षयच्या मनात रमाचं स्थान मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे; तर अक्षयला त्याच्याबरोबर घरामध्ये राहत असलेली माही त्याची खरी रमा नाही याबाबत माहीत नसल्यानं तो तिलाच रमा समजत असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आता या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये अक्षय माहीला रमा समजून “रमा पुन्हा एकदा आयुष्याची नव्यानं सुरुवात करू”, असं म्हणतो. तर, माही “मी आता कायमची अक्षयची होणार”, असं म्हणताना दिसते. तेवढ्यात तिथे साई येतो आणि माहीला म्हणतो, “अक्षय सरांनी तुमच्यासाठी गाडी पाठवली आहे. पण, खरं तर हा साई व रमानं आखलेला प्लॅन असतो.”
माही गाडीमध्ये बसते; परंतु, पुढे त्या गाडीच्या डिकीमध्ये रमा लपून बसलेली असते. माही गाडीत बसलेली असताना साई व रमा एकमेकांसह इशाऱ्यामध्ये संवाद साधतात. रमा डिकीट बसलेली असताना ती म्हणते, “मला रमा म्हणतात माही. जी कोणाचा हक्क मारत नाही आणि स्वत:चा हक्क सोडत नाही.” पुढे तीच रमा अक्षयबरोबर नवीन आयुष्याची सुरुवात करणार असल्याचंही म्हणताना दिसते. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अक्षयला माहीचं सत्य कळेल का? रमा अक्षयबरोबर नवीन आयुष्याची सुरुवात करू शकेल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या भागात मिळतील.
दरम्यान, ‘मुरांबा’ या मालिकेबद्दल बोलायचं झालं, तर १४ फेब्रुवारी २०२२ रोजी ही मालिका सुरू झाली होती. आता या मालिकेला चार वर्षं पूर्ण झाली असून, आजही या मालिकेला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतो. तर, रमा अक्षय पुन्हा कधी एकत्र येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे रमा माहीला धडा शिकवून, अक्षयला पुन्हा मिळवू शकेल का याची उत्सुकता मालिकेच्या चाहत्यांमध्ये आहे.