स्टार प्रवाहची ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका गेली दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतल्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. महाराष्ट्राच्या या लोकप्रिय मालिकेत लवकरच एक नवा अध्याय सुरु होतोय. या मालिकेत लवकरच एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. ‘ती’ नेमकी कोण आहे? जाणून घेऊयात…
एका नव्या गोष्टीसह ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत सुकन्या पाटील या नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. व्यवसायाने नर्स आणि अनेक गुपितं मनात साठवून शांत आयुष्य जगणारी मुलगी. रुग्णांची सेवा करायला तिला आवडतं म्हणूनच तिने हे क्षेत्र निवडलं आहे. यानिमित्ताने लोकांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचं निमित्त होता येतं याचा तिला आनंद आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’मध्ये सुकन्या पाटील ही भूमिका साकारण्यासाठी एन्ट्री घेतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर. नक्षत्रा जवळपास ४ वर्षांनंतर ती मालिकाविश्वात दमदार पुनरागमन करणार आहे.
या भूमिकेविषयी सांगताना नक्षत्रा म्हणाली, “माझ्या करिअरची सुरुवातच मालिकेने झाली होती. त्यामुळे टीव्ही हे लाडकं माध्यम आहे. प्रेक्षकांच्या जगात पुन्हा यायला मिळतंय याचा आनंद आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत सुकन्या पाटील हे पात्र मी साकारणार आहे. सुकन्या या पात्राविषयी ऐकताक्षणीच ते मला भावलं. सुकन्या आणि माझा स्वभाव बराच मिळताजुळता आहे. सुकन्या अत्यंत सकारात्मक आहे. तिचा देवावर प्रचंड विश्वास आहे. सुकन्याप्रमाणेच मी देखील माझ्या आयुष्यात जे काही चांगलं-वाईट घडतं ते देवावर सोडते.”
“छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणाऱ्या आणि नेहमी हसमुख असणाऱ्या सुकन्याच्या मनात मात्र प्रचंड वेदना आहेत. मला मिळालेलं आयुष्य भेट आहे, हक्क नाही असं तिचं मत आहे. ती स्वतःच्या भूतकाळाला कधीच कोणासमोर उघड करत नाही. तिच्या मते मी कोण आहे यापेक्षा, मी आज काय करते हे महत्त्वाचं आहे. सुकन्याचा भूतकाळ नेमका काय आहे? मालिकेची गोष्ट पुढे जाताना सुकन्याच्या येण्याने नेमकं काय घडणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.”
