Star Pravah Serial Off Air Today : स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘लपंडाव’ आणि दुसरी म्हणजे ‘नशीबवान’. नव्याने सुरू होणाऱ्या दोन नव्या मालिकांमुळे साहजिकच वाहिनीवरील जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.
साधारण एक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलेली मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि ती मालिका म्हणजे ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’. गेल्या वर्षी जून महिन्यात ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली असून, आता ही मालिका निरोप घेण्याच्या तयारीत आहे. मालिकेत मुख्य भूमिकांत अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता समीर परांजपे हे कलाकार होते.
काही दिवसांपूर्वी शिवानीने मालिका निरोप घेणार असल्याबाबत भावूक पोस्ट शेअर केली होती. अशातच आता मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीने भावूक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री सखी गुंडेय हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. सखीने आभा ही भूमिका साकारली आहे. तसेच तिची ही सहायक अभिनेत्री म्हणून पहिलीच मालिका आहे.
या पोस्टमधून सखी म्हणते, “‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही माझी पहिली मालिका आणि पहिल्याच मालिकेत मिळालेली छान भूमिका आणि एवढी सुंदर टीम. या प्रोजेक्टच्या निमित्ताने कस लावून काम करणारी आणि कॅमेर्यामागे तेवढीच धमाल करणारी माणसं मी पाहिली. मी एक-दीड महिना उशिरा जॉइन होऊनसुद्धा त्यांनी कधीच मला वेगळं वाटू दिलं नाही.”
त्यानंतर सखी म्हणते, “एवढी मजा, एवढी मस्ती, माझे इतके लाड, एवढं प्रेम पुन्हा कुठल्या सेटवर मिळेल की नाही माहीत नाही; पण एखादं चांगलं काम नक्कीच माझी वाट पाहत असेल. कुछ पाने के लिए कुछ खोना जरुर पडता है। या कामासाठी मी अपर्णामॅम आणि अतुलसरांची कायम ऋणी राहीन. अर्थात, हा पूर्णविराम नाही. या माणसांशी पुढे अनेक प्रोजेक्ट्सच्या निमित्ताने किंवा सहज भेटीगाठी होत राहतील; पण त्यात ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ कायम खास राहील.”
सखी गुंडेय इन्स्टाग्राम पोस्ट
दरम्यान, आज म्हणजेच १२ सप्टेंबर रोजी ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. मालिका संपणार असल्याचं कळताच मालिकेच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. सखीनं शेअर केलेल्या व्हिडीओखालीसुद्धा चाहत्यांनी तशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसंच मालिकेच्या सोशल मीडियावरील अनेक फॅन पेजेसनी मालिकेच्या निरोपावर दु:ख व्यक्त केलं आहे.