Muramba Serial Updates : स्टार प्रवाहवरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत. या वाहिनीवर नुकत्याच काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. पण जुन्या मालिकासुद्धा आजही प्रेक्षकांच्या तितक्याच आवडीच्या आहेत. यापैकीच एक मालिका म्हणजे ‘मुरांबा’. मालिकेने नुकताच ११०० भागांचा टप्पा पूर्ण केला. या प्रवासात मालिकेच्या संपूर्ण टीमला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. रमा-अक्षय यांच्या जोडीसह आणि संपूर्ण मुकादम कुटुंब प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं.
लवकरच मालिकेत सात वर्षांचा लीप येणार आहे. या सात वर्षांमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. या लिपचा एक नवा प्रोमोही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही गैरसमजांमुळे रमा-अक्षय एकमेकांपासून दुरावले आहेत. तर इरावती सुडबुद्धीने मुकादम कुटुंबाला उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. यात अक्षयच्या आयुष्यातली एकमेव आनंदी घटना म्हणजे रमा आणि त्याची लाडकी लेक आरोही.
अक्षयच्या आयुष्यात आरोहीची एन्ट्री झाली आहे. आपली आई पुन्हा आपल्याला भेटेल अशी आशा आरोहीला आहे आणि हेच मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून पाहायला मिळालं. ‘मुरांबा’मधली ही आरोही नक्की आहे तरी कोण? चला जाणून घेऊ…
‘मुरांबा’ मालिकेतली नवी बालकलाकार कोण?
‘मुरांबा’मधल्या आरोहीचं खरं नाव आहे आरंभी उबाळे. घारे डोळे आणि आपल्या निरागस अभिनयासाठी आरंभी उबाळे लोकप्रिय आहे. याआधी ती सन मराठीवरील ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेमधील तिची बिट्टू ही भूमिका चांगलीच गाजली होती. आरंभीने काही जाहिरातीतही काम केलं आहे.
त्याचबरोबर आरंभीने ‘गुम है किसीं के प्यार में’ आणि ‘अनुपमा’ या दोन गाजलेल्या हिंदी मालिकांत आणि ‘क्षण’ या मराठी शॉर्ट फिल्ममध्येही तिने अभिनय केला आहे. आरंभीची ‘वन टेक आर्टिस्ट’ म्हणूनही विशेष ओळख आहे. लहान वयात ती शिक्षण आणि अभिनय या दोघांमधील समतोल अगदी उत्तमपणे सांभाळत आहे.
दरम्यान, ‘मुरांबा’मधील सात वर्षांच्या लिपबद्दल शशांक केतकरने त्याच्या भावना व्यक्त करत असं म्हटलं, “मालिकेने ११०० भागांचा टप्पा गाठला आणि हा प्रवास अजूनही सुरु आहे, यासाठी स्टार प्रवाह वाहिनी, मालिकेची संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार. आपल्या आयुष्यात जसे टप्पे येतात; त्याप्रमाणे मालिकेतही वेगवेगळी वळणं येतात. रमा-अक्षयचं एकत्र येणं, त्यांचं प्रेम, त्यांची भांडणं हे अनुभवल्या नंतर आता त्यांच्या आयुष्यात एक चिमुकलीदेखील आहे.”