Suchitra Bandekar Share Emotional Memory : ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झालं. शनिवारी (१६ ऑगस्ट) रोजी सायंकाळी त्यांच्या निधनाचं वृत्त आलं आणि अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकला. त्यांच्या निधनाच्या बातमीचे वृत्त पचवणं अनेकांसाठीच जड गेलं. ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेत ज्योती चांदेकर पूर्णाआजीची भूमिका साकारत होत्या.

ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी दु:ख व्यक्त केलं. कलाकारांबरोबरच चाहते मंडळीसुद्धा त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. अशातच अभिनेत्री आणि ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकरांनी त्यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. राजश्री मराठीशी साधलेल्या संवादात त्यांनी ज्योती चांदेकरांविषयी भावना व्यक्त केल्या.

यावेळी सुचित्रा बांदेकर म्हणतात, “ज्योती ताईंबरोबर मी याआधी कधीही काम केलेलं नाही. ‘बिनधास्त’ सिनेमामध्ये मी त्यांना बघितलं होतं. ‘ठरलं तर मग’साठी आम्ही त्यांना विचारल्यानंतर त्यांनीही लगेच हो म्हटलं. तेव्हा मला त्यांच्या तब्येतीबद्दल माहीत होतच. पण जेव्हा मी त्यांना पाहिलं, तेव्हा सत्तरीतली बाई इतकी तरुण कशी असू शकते? मनानेसुद्धा या इतक्या तरुण कशा? असा प्रश्न मला पडला.”

यापुढे त्या सांगतात, “कुठल्याही प्रकारचा सीन असो, तो लीलया पार पडणे म्हणजे काय ते त्यांच्याकडून शिकावं. लेखक किंवा दिग्दर्शकाच्या काही सुचनेनंतर तो सीन पडद्यावर कशा पद्धतीने साकारायचा, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. अशी जिंदादिल बाई होती ज्योती ताई…”

यापुढे सुचित्रा बांदेकर म्हणतात, “त्या दर महिन्यात सहा ते सात दिवसांत पुण्याला जायच्या. चेकअप करुन पुन्हा यायच्या. मालिकेत नुकतंच महासंगमचे चित्रीकरण केल्यानंतर आम्ही एकत्र जेवत असताना त्या मला म्हणाल्या, “सूचित्रा मी सहा दिवस जाऊन येते”, तेव्हा मी त्यांना “ज्योतीताई सहा दिवस जाताय? आता इतकं कट-टू-कट शूटिंग आहे” असं म्हणाले. पण त्यांनी मला त्यांचे पाय सुजल्यामुळे जावच लागेल असं सांगितलं. त्यावर मीसुद्धा त्यांना “काही हरकत नाही” असं म्हणाले.”

यानंतर सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, “त्या १० तारखेला सेटवरून गेल्या आणि ११ तारखेला त्यांनी पुण्यात फिजिओ घेतलं. १२ तारखेला त्यांना अॅडमिट केलं. त्याचदिवशी रात्री ११ च्या दरम्यान मला तेजस्विनी पंडीतचा फोन आला. मला रात्रीच्या वेळेत कोणी कॉल करत नाही. तेव्हा तिचा कॉल बघून मला वाटलं की, ज्योतीताईंना आणखी काही दिवस लागणार असतील. पण तेजस्विनीने मला ज्योतीताई व्हेंटिलेटरवर असल्याचं सांगितलं. ते ऐकून मला धक्काच बसला. कारण त्याच्या आदल्या दिवशीच मी त्यांच्याशी बोलले होते. त्यावर तेजस्विनी म्हणाली, “आईला पूर्ण शरीरभर Bacterial Infection झालं आहे. तिने त्यानंतर चार-पाच दिवस त्याचा सामना केला. पण शेवटी नको ते झालं.”

यापुढे सुचित्रा ज्योती चांदेकरांविषयी भावुक होत म्हणाल्या, “त्या गेल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही न भरून येणारी आहे. ‘ठरलं तर मग’ मालिका, स्टार प्रवाह वाहिनी आणि संपूर्ण मराठी इंडस्ट्रीचं न भरून येणारं नुकसान आहे. ज्योतीताई कित्येकदा सेटवर आजारी पडायची. मग सेटवरील मुलं त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायचे. घरी सोडायचे. पुन्हा तिथून सेटवर आणायचं. सगळ्यांनी त्यांचं इतकं प्रेमाने केलं; कारण त्याही तितकंच प्रेम करायच्या.”