Suchitra Bandekar : सुचित्रा व आदेश बांदेकर यांचा एकुलता एक मुलगा सोहम बांदेकरच्या लग्नाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू आहेत. आता लेकाच्या लग्नाबद्दल सुचित्रा बांदेकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.

सोहम सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘ठरलं तर मग’ या दोन यशस्वी मालिकांचा निर्माता म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. याशिवाय यापूर्वी ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून तो अभिनेत्याच्या रुपात देखील प्रेक्षकांसमोर आला आहे. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

सुचित्रा बांदेकर यांनी नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी लेकाच्या लग्नाबद्दल त्या म्हणाल्या, “सोहमचं लग्न हे आता माझ्यासाठी प्राधान्य आहे. मला असं वाटतं मुलांनी वेळेत सेटल व्हायला पाहिजे. कशाला उगाच वेळ काढत बसायचं? लग्नानंतर तुमच्या आयुष्याची एक सेकंड इनिंग सुरू होते…लग्न ही संकल्पना किती छान आहे दोघांनी मिळून आपलं आयुष्य सुरू करायचं हे छानच आहे. मला कूल सासूबाई व्हायचं आहे.”

मस्त मजेत राहा, तुमचा संसार तुम्ही करा….

लेकाला लग्नासाठी काय सल्ला दिलाय याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाल्या, “जसं आदेशच्या आईचं म्हणणं होतं तेच मी सोहमला सांगणार आहे. लग्न झाल्यावर मुलांनी वेगळं राहायचं, तुमचा संसार तुम्ही करायचा. तुम्हाला काही लागलं तर मी आहे…रोज माझ्याकडे घरी येऊन जेवा काहीच हरकत नाही पण, त्यानंतर तुमचा संसार तुम्ही करा. सोहमला सुद्धा मी हेच सांगितलं आहे, लग्न झालं की वेगळं राहायचं. मस्त मजेत राहा…समोरच्या मुलीचं सुद्धा माहेर आहे, तिचेही आई-बाबा आहेत. सगळ्यांनी मस्त राहा…मी इतकी वर्षे माझं घर सांभाळलं आता तुम्ही तुमचं करा.”

“मी अशी कधीच लाख रुपयांची साडी वगैरे घेतलेली नाहीये. पण, कदाचित सोहमच्या लग्नासाठी घेऊ शकते. आता तो २८ वर्षांचा आहे त्यामुळे आता लवकरच त्यांच्या लग्नाचं बघायचं आहे. बांदेकरांची सून कोण आहे हे तुम्हाला थोड्या दिवसांतच कळेल.” असं सुचित्रा बांदेकर यांनी सांगितलं.

दरम्यान, ‘राजश्री मराठी’ला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘येड लागलं प्रेमाचं’ फेम अभिनेत्री पूजा बिरारी बांदेकरांची सून होणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, या वृत्ताला अद्याप बांदेकर कुटुंबीयांनी दुजोरा दिलेला नाहीत, अथवा याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याशिवाय सोहमने सुद्धा लग्नाबाबतची कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.