Sukanya Mone : स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवीन मालिका सुरू होत आहे आणि या मालिकेचं नाव आहे ‘कोण होतीस तू काय झालीस तू’. या मालिकेतून स्टार प्रवाहचीच गाजलेली जोडी म्हणजेच अभिनेत्री गिरिजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. शिवाय सुकन्या मोने व वैभव मांगले हे कलाकारदेखील या मालिकेच्यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.
सुकन्या मोने-वैभव मांगले यांचं पहिल्यांदाच एकत्र काम
‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेच्या निमित्ताने सुकन्या मोने आणि वैभव मांगले हे कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. मात्र मालिकेच्या प्रमोशनवेळी त्यांच्यातील खास बॉण्डमुळे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करत असल्याचे जाणवलंच नाही. नुकतीच मालिकेची टीम प्रमोशनसाठी कुडाळमध्ये दाखल झाली होती. यावेळी सुकन्या व वैभव यांच्यात मजामस्ती झाली आणि याचे काही खास क्षण पाहायला मिळाले.
सुकन्या मोनेंनी सांगितला वैभव मंगलेंचा खास किस्सा
अशातच सुकन्या यांनी वैभव यांची माफी मागितली आहे. याबद्दल त्यांनी ‘लेट्सअप’ला एक खास किस्सा सांगितला. यावेळी सुकन्या यांनी असं म्हटलं की, “वैभवने सांगताना असं म्हटलं की, मालिकेत मला एक मुलगी आहे. मी तिचं एकुलता एक बाप आहे. मला बायको नाही. तर प्रेक्षकांमधल्या एका काकांना हे खरंच वाटलं की त्याला खऱ्या आयुष्यातही बायको नाही. वैभव मला माफ कर.”
सुकन्या मोनेंनी मागितली वैभव मांगलेंची माफी
यापुढे त्या असं म्हणाल्या की, “समस्त महाराष्ट्राला हे कळलं पाहिजे असं मला वाटतं म्हणून मी हे सांगते की, त्या काकांनी वैभवला एक कार्ड दिलं. ज्यावर ‘श्री स्वामी समर्थ वधू सूचक केंद्र’ असं लिहिलेलं होतं. त्यावर ते त्याला ‘तुम्ही संध्याकाळी माझ्याकडे या. मला भेटा’ असंही म्हणाले. याचबद्दल वैभव आणि माझ्यात बोलणं सुरू होतं आणि तेव्हा तो मला म्हणाला की, याद राख तू हे कुणाला सांगितलंस तर…”
कोकणात ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ कलाकारांचं स्वागत
नव्याने सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी संपूर्ण टीम कोकणात दाखल झाली आहे. वाहिनीचे हेड सतीश राजवाडे यांनी मालिकेतील कलाकारांसह कुडाळ गाठले असून लवकरच मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ रेल्वे स्थानकात ही सगळी कलाकार मंडळी पोहोचताच स्थानिक महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. शिवाय दशावताराचा खेळही रंगला. याचे खास क्षण सोशल मीडियावर पाहायला मिळाले.
‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकेत कलाकारांची मांदियाळी
‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकेच्या कोकणातील चित्रीकरणाविषयी अनेक प्रेक्षकांनी उत्सुकता व्यक्त केली आहे. गिरीजा-मंदार ही जोडी पुन्हा एकत्र दिसणार असल्याने त्यांचे चाहतेही या मालिकेची आतुरेतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या मालिकेत गिरीजा, मंदार, वैभव मांगले, सुकन्या मोने यांच्याबरोबरच साक्षी गांधी, अमित खेडेकर, अमृता माळवदकर हे कलाकारदेखील प्रमुख भूमिकांमध्ये पाहायला मिळतील.