Madhavi Nimkar Talks About Social Media : सोशल मीडिया अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. अनेक कलाकार मंडळीही यामार्फत त्यांच्या कामासंबंधित तसेच खासगी आयुष्यातील फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच आता सुख म्हणजे नक्की काय असतं फेम अभिनेत्री माधवी निमकरने नुकतच याबद्दल तिची प्रतिक्रिया दिली आहे.
माधवी निमकरने सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून शालिनीची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तिच्या दमदार अभिनयाने तिने अनेकांची मनं जिंकली. अशातच तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगितलं आहे. ती सोशल मीडियावर कामापुरतीच सक्रिय असल्याचं तिने यातून म्हटलं आहे.
खासगी आयुष्याबद्दल माधवी निमकरची प्रतिक्रिया
तसेच ती सोशल मीडियावर नवऱ्याबरोबरचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत नसल्याने अनेकांना तिचा घटस्फोट झाला आहे का असं वाटतं यावर आता तिने प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियाबद्दल ती म्हणाली, “मला ते आवडत नाही तुम्ही कधीही बघा २०१० पासून जेव्हा इन्स्टाग्राम आलंय तेव्हापासून आतापर्यंत कधीच माझ्या कुटुंबाबद्दल मी काहीही सोशल मीडियावर टाकलेलं नाही. तेव्हाही घटस्फोट झालेला नव्हता आणि आताही झालेला नाही. जेव्हा इन्स्टाग्राम आलं तेव्हा माझे पती मला म्हणायचे तू पण तुझे असे फोटो पोस्ट कर काहीतरी नवीन ट्रेंड येतोय वगैरे.”
माधवी पुढे म्हणाली, “पण त्यावेळी मी ठरवलं की, इन्स्टाग्राम फक्त आपण आपल्या कामासाठी वापरायचं. आता इन्स्टाग्राम फार गरजेचं झालं आहे. कामाच्यादृष्टीने फार महत्त्वाचं आहे आणि त्यावर अपडेट राहणं गरजेचं असतं. तुम्ही सतत त्यावर सक्रिय असाल तर ती गोष्ट वेगळी आहे पण मी १५-२० मिनीटच वापरते.”
माधवी पुढे म्हणली, “राहिला प्रश्न कुटुंबाबद्दल काही पोस्ट करण्याचा तर, माझं काही नवीन लग्न झालेलं नाहीये. की पटकण दसरा, दिवाळीला फोटो टाकायचे आणि जरी नवीन लग्न झालेलं नसलं तरी, मी पहिल्यापासूनच टाकत नाही. क्वचित कधी आम्हाला वाटलं तरंच आम्ही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेले आहेत. माझ्या मुलालाही सोशल मीडिया फार आवडत नाही. आम्ही एकदाच फक्त एकत्र रील पोस्ट केली होती.”
माधवी पुढे कलाकारांबद्दल म्हणाली, “खूप सारे कलाकार सोशल मीडियावर कुटुंबाबरोबरचे फोटो पोस्ट करत असतात. त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टींबद्दल ते बोलत असतात. अर्थात तो प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे त्यामुळे ते चूक आहे की बरोबर हा नंतरचा मुद्दा आहे.”
“सोशल मीडियावर काय पोस्ट करायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. मी तर अशी कुटुंबही पाहिली आहेत खूप जवळून जे सोशल मीडियवर एकमेकांसह खूप चांगले असतात. छान फोटो व व्हिडीओ पोस्ट करतात पण खऱ्या आयुष्यात ते चित्र खूप वेगळं असतं कारण मी ते खूप जवळून पाहिलेलं आहे. खऱ्या आयुष्यात त्यांची एकमेकांबद्दलची मतं चांगली नाहीयेत. एकमेकांबद्दल आदर नाहीये. मी त्यांच्याव टीका करत नाही, काही प्रतिक्रिया देत नाही.”