Sulekha Talwalkar Praises Daughter : सुलेखा तळवलकर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांच्या सासूबाई दिवंगत अभिनेत्री स्मिता तळवलकर यांच्याप्रमाणे त्यांनीसुद्धा अभिनयक्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सुलेखा यांनी नुकतीच त्यांच्या मुलांसह मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या लेकीचं कौतुक केलं.

सुलेखा तळवलकर यांची दोन्ही मुलं सध्या अभिनयक्षेत्रापासून दूर आहेत. सुलेखा यांनी पहिल्यांदाच त्यांच्या मुलांसह एकत्र मुलाखत दिली आहे. त्यांचा मुलगा फिटनेस क्षेत्रात कार्यरत आहे. तर मुलगी टिया नुकतीच पुढील शिक्षणासाठी दिल्लीला जाणार आहे. ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत टिया तळवलकरला तिच्या शिक्षणाबद्दल तसेच आवडी-निवडींबद्दल विचारण्यात आलं.

अवघ्या ४ वर्षांची असल्यापासून स्वयंपाक करते सुलेखा तळवलकरांची लेक

टियाने हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात शिक्षण घेतलं असून ती पुढील शिक्षणासाठी दिल्लीला जाणार आहे. लहानपणापासून जेवण बनवण्याची प्रचंड आवड आहे, असं टियाने सांगितलं. टिया म्हणाली, “नुकतीच माझी हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री पूर्ण झाली आहे आणि आवडीबद्दल सांगायचं झालं तर मी ३ किंवा ४ वर्षांची होते जेव्हापासून मी आजीला किचनमध्ये मदत करायला लागले. तेव्हापासूनच मला जेवण बनवण्याची आणि लोकांना खाऊ घालण्याची खूप आवड होती.”

टिया पुढे म्हणाली, “आई जेव्हा शूटिंगवरुन यायची तेव्हा मी तिच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवायचे.” सुलेखा पुढे लेकीबद्दल म्हणाल्या, “जशी ती मोठी होती गेली तसं मी शूटिंगवरुन येताना तिला फोन करायचे की आज काय बनवलंय वगैरे. ती उत्तम गृहिणीसुद्धा आहे. घर नीट नेटकं ठेवायचं. आवरुन ठेवायचं सगळा स्वयंपाक करायचा आणि तो केल्यानंतरही ओटा पाहिल्यावर वाटणार नाही की तिथे काही जेवण बनवलं आहे वगैरे. इतकं स्वच्छ करते ती.”

टिया पुढे म्हणाली, “यामुळे माझी जेवण बनवण्याची आवड वाढली. नंतर मी दादरच्या केटरिंग कॉलेजमध्येच प्रवेश घेतला. तीन वर्षे तिकडे डिग्री केली आणि आता माझी डिग्री पूर्ण झाली आहे. मी मॅनेजमेंट ट्रेनिंग करायला दिल्लीला जाणार आहे.”

टियाने तिच्या आजी स्मिता तळवलकर यांच्याबद्दलही सांगितलं. “आपण बाहेर जाऊन वेगवेगळ्या पदार्थांबद्दल शिकतो पण आम्ही घरातच हे सर्व शिकायचो. स्मिता आजीकडून मी मासे बनवण्यापूर्वी ते नीट साफ करायला शिकले. मासे आणण्यापासून ते, त्यासाठी लागणारं वाटण आणि ते कसे बनवायचे हे सगळं मी स्मिता आजीकडून शिकले,” असं टिया म्हणाली.