Sulekha Talwalkar Talk’s About Smita Talwalkar : सुलेखा तळवलकर मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. सुलेखा यांनी त्यांच्या सासू दिवंगत अभिनेत्री स्मिता तळवलकर यांच्याप्रमाणेच त्यांच्या कामातून प्रेक्षकांची मनं जिंकत इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशातच सुलेखा यांनी एका मुलाखतीत त्यांच्या सासूबाईंबद्दल सांगितलं आहे

सुलेखा तळवलकर अनेक कलाकारांच्या मुलाखती घेत असतात. अनेकदा त्या लोकप्रिय कलाकारांबद्दल यामार्फत बोलत असतात. अशातच आता त्यांनी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली असून यामधून त्यांनी त्यांच्या सासूबाई व दिवंगत लोकप्रिय अभिनेत्री स्मिता तळवलकर यांच्याबद्दल सांगितलं आहे. सासूबाईंबद्दल बोलताना त्या भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

सुलेखा स्मिता यांच्याबद्दल बोलताना म्हणाल्या, “स्मिताताईंचा विषय निघाला की थोडसं हृदय भरून येतं आणि असा एकही दिवस जात नाही, जेव्हा त्यांची आम्हाला आठवण येत नाही.” पुढे सुलेखा यांनी सांगितलं की, “अस्मिता चित्र अकॅडमीचा श्रद्धांजलीचा एक कार्यक्रम करत होतो मी आणि माझी आई. तेव्हा आम्ही असं ठरवलेलं की, सगळी लोकं जमा होईपर्यंत आपण स्मिता ताईंची गाणी लावूयात आणि एका चित्रपटात त्यांची गाणी नव्हती आणि आम्ही विचार करत होतो की, कुठलं गाणं वगैरे; तेव्हा मी माझ्या आईला म्हटलं की मला आठवत नाहीये, तर ती पटकन म्हणाली की अगं वेडी स्मिताला फोन कर ना, म्हणजे त्यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमातसुद्धा आम्हाला असं वाटलं की त्या आहेत.”

स्मिता तळवलकर या मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांत काम केलं. अभिनयासह त्या निर्मात्यासुद्धा होत्या. त्यांनी ‘चौकट राजा’, ‘तू तिथे मी’, ‘राम रहीम’, ‘सवत माझी लाडकी’, ‘सात्याच्या आत घरात’, ‘कळत नकळत’, ‘आटली बाटली फुटली’, ‘गडबड घोटाळा’, ‘छडी लागे छम छम’, ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’, ‘आनंदाचे झाड’, ‘धाकटी सून’, ‘आहुती’, ‘तू सौभाग्यवती हो’ यांसारखे चित्रपट केले होते.

दरम्यान, सुलेखा यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर सुलेखा तळवलकर सध्या ‘झी मराठी’वरील ‘सावळ्याची जणू सावली’ आणि ‘स्टार प्रवाह’वरील ‘मुरांबा’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. या दोन्ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी आहेत.