Sulekha Talwalkar Was Afraid To Send Her Daughter To Delhi : सुलेखा तळवलकर या मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. सध्या त्या ‘सावळ्याची जणू सावली’ आणि ‘मुरांबा’ अशा दोन मालिकांमध्ये काम करत आहेत. अशातच त्यांनी नुकतीच त्यांच्या मुलांसह मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल माहिती दिली आहे.

सुलेखा यांनी त्यांची दोन्ही मुलं आर्य तळवलकर व टिया तळवलकरसह ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. त्यांचा मुलगा अभिनय क्षेत्रापासून दूर असून, फिटनेस या क्षेत्रात सक्रिय आहे. तर, त्यांची मुलगी उच्च शिक्षणासाठी दिल्लीला जाणार आहे. याबाबत त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. त्यामध्ये त्यांच्या मुलीला तिच्या शिक्षणाविषयी विचारण्यात आलं होतं.

सुलेखा तळवलकर यांची लेक कोणत्या क्षेत्रात घेतेय शिक्षण?

सुलेखा यांची मुलगी तिच्या शिक्षणाबद्दल म्हणाली, “आता माझी डिग्री झाली आहे. मी हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलं आहे. मला लहानपणापासूनच जेवण बनवण्याची खूप आवड होती. जेवण बनवणं, लोकांना खाऊ घालणं हे मला खूप आवडतं. नंतर मी दादरच्या केटरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आता दोन महिन्यांपूर्वी मला डिग्री मिळाली आहे. आता मी मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी लवकरच दिल्लीला शिफ्ट होत आहे.”

सुलेखा तळवलकरांनी लेकीबद्दल व्यक्त केली काळजी

सुलेखा यांनी यावेळी सांगितलं, “तिनं संपूर्ण देशभरात ५४ क्रमांक मिळवला आहे. तिला पुढच्या शिक्षणासाठी दिल्लीत अॅडमिशन मिळालं आहे; पण मला तिला दिल्लीला पाठवायला भीती वाटली. परंतु, आता तिचं इथलं शिक्षण पूर्ण झालं असून, पुढच्या शिक्षणासाठी ती दिल्लीला चालली आहे. माझ्याकडे काही पर्याय नाहीये आता. कारण- तिची निवड झालीये.”

याच मुलाखतीमध्ये सुलेखा यांनी त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना अभिनय क्षेत्रात न येण्याचा सल्ला दिल्याचं सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, “टिया ‘मिस दादर’ होती. तिनंसुद्धा मॉडेलिंगमध्ये काम केलं आहे; पण तिलासुद्धा मी हेच सांगितलं होतं की, हे तू करिअर म्हणून घेऊ नकोस. तुझं जे अकॅडमिक करिअर आहे, तुला जे बनायचं आहे, जिथे तू स्वत:ला पाहिलेलं आहेस, आधी ते करण्याचा प्रयत्न कर.”

अभिनय क्षेत्राबद्दल सुलेखा पुढे म्हणाल्या, “या क्षेत्रात आल्यानंतर मग तिला तिच्या क्षेत्रातील कामासाठी वेळ मिळणार नाही., म्हणून मी सांगितलेलं की, आधी ते करा, मग इकडे या. कारण- अभिनय श्रेत्रातही फक्त छान दिसता म्हणून कामं मिळत नाहीत. तुम्हाला काही गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. एक तर भाषेवर अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे आपलं करिअर सोडून काहीही करायचं नाही.”