Sulekha Talwalkar Talks About Her Children’s Acting Career : सुलेखा तळवलकर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आजवर त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या त्या ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. अशातच त्यांनी नुकतीच त्यांच्या दोन्ही मुलांसह मुलाखत दिली आहे.

सुलेखा तळवलकर यांनी त्यांची मुलगी टिया तळवलकर व मुलगा आर्य तळवलकरबरोबर ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या मुलांबद्दल सांगितलं आहे. मुलाखतीमध्ये सुलेखा यांच्या मुलाला “तू छान दिसतोस, फिट आहेस, मग कधी अभिनयक्षेत्रातून विचारणा झाली का?” असा प्रश्न विचारण्यात आलेला. यावर तो म्हणाला, “मला यासाठी ऑफर यायच्या आणि अजूनही येतात, आईलाही माझ्यासाठी विचारलं जातं.”

सुलेखा तळवलकर यांची प्रतिक्रिया

सुलेखा तळवलकर पुढे म्हणाल्या, “माझा नंबर इंडस्ट्रीत अनेकांकडे असल्याने मलाच फोन येतात. त्यातल्या अर्ध्या गोष्टी तर मी त्यांना सांगतही नाही. मला जेव्हा मुलांसाठी फोन येतो तेव्हा मी त्यांना नाही सांगते, गेल्या अनेकवर्षांपासून या क्षेत्रात काम करत असल्याने मला माहित आहे की, आपलं क्षेत्र अस्थिर आहे, आज काम आहे तर उद्या नाहीये असं होऊ शकतं; त्यामुळे जर का त्यांनी त्यांचं क्षेत्र निवडलेलं आहे आणि त्यात ते उत्तम काम करत आहेत तर मला त्यांनी निवडलेल्या करिअरमध्ये खूप यशस्वी झालेलं पाहायचं आहे.”

सुलेखा तळवलकर यांनी मुलांना दिलेला अभिनयक्षेत्रात न येण्याचा सल्ला

सुलेखा पुढे म्हणाल्या, “त्यांनी निवडलेल्या करिअरमध्ये ते स्थिरावले की नंतर त्यांना जर छंद म्हणून अभिनय करायचा असेल तर काही हरकत नाही. पण, ते तुमचं करिअर करू नका, आता तरी नाही. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये आधी ठाम घट्ट पाय रोवून उभे राहा, मग या क्षेत्रात या.” सुलेखा पुढे लेकीबद्दल म्हणाल्या, “टिया मिस दादर होती. तिनेसुद्धा मॉडेलिंगमध्ये काम केलं आहे, पण तिलासुद्धा मी हेच सांगितलं होतं की, हे तू करिअर म्हणून घेऊ नकोस. तुझं जे अॅकेडमिक करिअर आहे, तुला जे बनायचं आहे, जिथे तू स्वत:ला पाहिलेलं आहेस, आधी ते करण्याचा प्रयत्न कर.”

अभिनयक्षेत्राबद्दल सुलेखा पुढे म्हणाल्या, “या क्षेत्रात आल्यानंतर मग तिला तिच्या क्षेत्रातील कामासाठी वेळ मिळणार नाही, म्हणून मी सांगितलेलं की आधी ते करा मग इकडे या, कारण अभिनयक्षेत्रातसही फक्त छान दिसता म्हणून कामं मिळत नाहीत. तुम्हाला काही गोष्टींचा अभ्यास करावला लागतो. एकतर भाषेवर अभ्यास करावा लागणार आहे, त्यामुळे आपलं किरअर सोडून काहीही करायचं नाही.”

सुलेखा तळवलकर यांचा मुलगा फिटनेस क्षेत्रात कार्यरत आहे तर त्यांच्या मुलीने नुकतीच हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली असून आता पुढील शिक्षणासाठी ती दिल्लीला जाणार आहे. याबाबत त्यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे.