Suraj Chavan Wedding Updates : सूरज चव्हाण गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे घराघरांत लोकप्रिय झालेला ‘गुलीगत किंग’ सूरज चव्हाण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याची होणारी बायको कोण आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून आतुर होते. अखेर अंकिता वालावलकरच्या घरी केळवणासाठी गेल्यावर सूरजने आपल्या पत्नीची सर्वांना ओळख करून दिली आहे.
सूरजच्या होणाऱ्या बायकोचं नाव आहे संजना. सूरज व संजना या महिन्यात २९ नोव्हेंबरला लग्न करणार आहेत. २८ नोव्हेंबरपासून त्याच्या लग्नविधींना सुरुवात होईल. जेजुरीजवळील सासवड याठिकाणी हा लग्नसोहळा पार पडणार आहे. सूरज व संजना यांचं पहिलं केळवण काही दिवसांपूर्वीच अंकिता वालावलकरच्या घरी पार पडलं होतं.
यानंतर अंकिता सूरज व संजनासह लग्नाच्या खरेदीसाठी निघाली. हळद, संगीत, लग्न, रिसेप्शनसाठी वेगवेगळे कपडे, सुंदर साड्या या सगळ्याची खरेदी सूरजने अंकिताच्या उपस्थितीत केली. लाडक्या भावाला काय हवं, काय नको, त्याला कोणते कपडे छान दिसतील या सगळ्याची जबाबदारी अंकिताने घेतली होती. त्यामुळे या भावा-बहिणीच्या नात्याचं सर्वत्र विशेष कौतुक करण्यात येत आहे.
मात्र, सूरजची ही लाडकी बहीण काही कारणास्तव त्याच्या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाहीये. अंकिता म्हणते, “लग्नाला जाणं मला शक्य होणार नाहीये. नेमकं त्याचवेळी आमच्या जवळच्या कुटुंबीयांचं लग्न आहे आणि सूरजच्या लग्नाची तारीख खूपच घाईत ठरली होती. त्याच्यामुळे मला जाणं शक्य होणार नाहीये. पण, आता त्याला जेवढी मदत लागतेय तेवढी मी करतेय. तो खूप बोलतोय ये ना…पण, खरंच शक्य होत नाहीये. कारण, आम्ही त्या दिवशी आहोत नागपूरला. नागपूरवरून मी मुंबईला येईन पण, मुंबईवरून त्याच दिवशी बारामतीला प्रवास करणं खरंच खूप वेळ होईल. पण, मी लग्नाच्या आधी एकदा त्याला जाऊन भेटेन आणि त्यानंतरही जाईन.”
दरम्यान, सूरज चव्हाणच्या लग्नाला आता ‘बिग बॉस मराठी’मधील कोणकोणते कलाकार उपस्थित राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
