Swanandi Tikekar Talk’s About Her lovestory : स्वानंदी टिकेकर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधून ती घराघरात पोहोचली. अशातच तिने नुकतेच तिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगितले आहे. स्वानंदीने तिच्या लग्नाबद्दल सांगितले आहे.
स्वानंदीने गायक आशीष कुलकर्णीशी लग्न केले. नुकतीच या दोघांनी ‘अनुरूप’ विवाह संस्थेला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल, तसेच त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितले आहे. त्यामध्ये त्यांना त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, ते गायक रोहित राऊत व जुईली जोगळेकरमुळे पहिल्यांदा भेटले.
आशीष कुलकर्णीनीने सांगितला स्वानंदीबरोबरच्या पहिल्या भेटीचा किस्सा
आशीष पहिल्या भेटीबद्दल म्हणाला, “जुईलीचा वाढदिवस होता आणि पार्टीसाठी रोहितनं सगळ्यांना बोलावलेलं. तेव्हा मी विचारलेलं की, कोण कोण येणार आहे. तेव्हा त्यानं सांगितलं की, स्वानंदी येणार आहे. स्वानंदी प्रसिद्ध होती आणि मला ती माहीत होती. आम्ही आजूबाजूच्याच कॉलेजमध्ये होतो आणि तिथेच आम्ही पहिल्यांदा भेटलो; पण पहिल्या भेटीतच आम्हाला असं वाटलं की, आम्ही एकमेकांना खूप आधीपासून ओळखतो वगैरे तेव्हा रोहितनं तिला माझी ओळख करून दिली की, हा आशीष कुलकर्णी तेव्हा मी म्हटलं की, कशाला औपचारिकता वगैरे त्यापेक्षा तू हॅंडशेक कर आणि एक मिठी मार. मी आपली मैत्री झाली, असं जाहीर करतो”.
स्वानंदी पुढे म्हणाली, “पटकन मिठी मार. आपली मैत्री होईल, असं कोण बोलतं. त्यामुळे मला वाटलं की, हा खूप मॉडर्न आहे; पण मला तो क्युटपण वाटला.” स्वानंदीने सांगितले की, दोन वर्षे ते दोघेही एकाच परिसरात राहत होते. परंतु, त्यांची कधीच भेट झाली नव्हती. मुलाखतीत पुढे त्यांना, लग्न करूयात, असं कधी ठरवलं, असं विचारण्यात आलेलं. आशीष म्हणाला, “आम्हा दोघांनाही लग्न करायचं होतं. त्यावेळी तीसुद्धा मला थोडा भाव देत होती.” त्यावेळी स्वानंदी ‘झी मराठी’वरील ‘अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई’ या मालिकेत काम करत होती. त्यामध्ये सुकन्या मोने यांनी तिच्या सासूबाईंची भूमिका साकारलेली. स्वानंदी याबाबत म्हणाली, “मालिका करीत असताना मला याचे मेसेजेस यायचे. तो मला गाणी गातानाचे व्हिडीओ पाठवायचा. त्यावेळी सेटवर सुकन्या मावशी होती. तिला मी सांगितलेलं तेव्हा ती म्हणालेली की, सांगू नकोस कोणाला. तेव्हा पहिल्या भेटीनंतर लगेच तीन दिवसांनी मला सुट्टी होती आणि तो माझ्या घरी आलेला जेवण घेऊन. आम्ही समोरा समोर टेबलावर बसून बोलत होतो.”
स्वानंदिला आशीषने ‘अशी’ घातलेली लग्नाची मागणी
आशीष पुढे म्हणाला, “मी तिला म्हटलं की, आपण ३-४ दिवस झाले एकमेकांना ओळखत आहोत. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मला हे नंतर नाही ऐकायचं की, मैत्री झाली आणि नंतर म्हणणार की, मी तुझ्याबद्दल हा विचार केलाच नव्हता वगैरे. मी तिला म्हटलं की, वेळ घे तुझा. पण जर तुझा होकार असेल, तरच आपण पुढे जाऊयात; नाही तर उगाच बोलत बसण्यात काही अर्थ नाही. तेव्हा तिनं होकार दिला.”
स्वानंदी याबाबत म्हणाली, “तो मला म्हणाला की, लग्नाच्या दृष्टीनं डेट करणार आहेस का? मी त्याला म्हटलं की, मला तुझं बोलणं आवडलं; पण आता आपल्याला अनुभवावरून कळतं की, आपलं या व्यक्तीबरोबर पटणार आहे की नाही वगैरे आणि जर सगळं जुळत असेल, तर मला तीन महिन्यांच्या आत साखरपुडा आणि वर्षभरात लग्न करायचं आहे. त्याला तो हो म्हणाला.”
पहिल्या भेटीच्या ३-४ दिवसांनंतर लग्न करायचं ठरल्यानंतर स्वानंदी व आशीषने डिसेंबर २०२३ मध्ये लग्न केले. या दोघांच्या लग्नाला दीड वर्ष झाले आहे. दोघांनाही गायनाची आवड असून, आशीष गायन क्षेत्रात, तर स्वानंदी अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे.