TMKOC fame Mayur Vakani became emotional: मनोरंजनसृष्टीत अशा अनेक भावा-बहिणींच्या जोड्या आहेत, ज्यांनी त्यांच्या कामातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही कलाकार असे आहेत की ज्यांनी एकाच मालिकेत अथवा एकाच चित्रपटांत काम केले आहे.
अभिनेता मयूर वकानी व अभिनेत्री दिशा वकानी हे कलाकार अशाच भावा-बहिणीची जोडी आहे, ज्यांनी त्यांच्या भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत मयूर व दिशाची भूमिका घराघरांत पोहोचली. दिशाने दयाबेनची भूमिका साकारली होती. तर, मयूरने सुंदर ही भूमिका साकारली होती.
मालिकेत काही काळ काम केल्यानंतर दिशाने मालिकेतून एक्झिट घेतली. त्यानंतरही मयूर मालिकेत काम करताना दिसला. दयाबेन आणि सुंदर यांच्या बॉण्डिंगने जितके प्रेक्षकांचे मन जिंकले. तितकेच जेठालाल आणि सुंदर यांच्यातील छोट्या-छोट्या मजेशीर भांडणांनी प्रेक्षकांचे मोठे मनोरंजन केले.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेला नुकतीच १७ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने सर्व कलाकारांनी एकत्र येत आनंद साजरा केला. मालिकेतील कलाकार त्यांच्या प्रियजनांबरोबर या कार्यक्रमाला हजर होते. या कार्यक्रमात अभिनेता मयूर वकानीदेखील उपस्थित होता. यावेळी त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या.
मयूर वकानी झाला भावुक
व्हायरल भयानीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. मयूर वकानी मालिकेबद्दल बोलताना, बहिणीबरोबर काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल बोलताना भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. अभिनेता म्हणाला, “मी माझ्या बहिणीबरोबर लहानपणापासून थिएटर केलं, तिच्याबरोबर अभिनयाचा प्रवास माझा लहानपणापासूनच सुरू झाला होता.”
पुढे मयूरने मालिकेचे निर्माते असित मोदी यांचे आभार मानले. तो म्हणाला, “तुमच्यामुळे हा प्रवास अखंड सुरू राहिला. आपल्या बहिणीबरोबर इतका दूरवरचा प्रवास करता येईल, अशी संधी सगळ्यांनाच मिळते असे नाही. ईश्वराच्या कृपेने बहिणीबरोबर काम करताना मला खूप मजा करता आली.
“आज ती या मालिकेत काम करत नाही. पण, तरीसुद्धा मी काम करत आहे. मी पूर्ण टीमचा आभारी आहे. तुम्ही सगळ्यांनी मला पाठिंबा दिला. मला माझ्या बहिणीची आठवण येत आहे. हा प्रवास खूप उत्तम होता”, असे म्हणताना मयूर भावुक झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, अभिनेत्री दिशा वकानीने काही वर्षांपूर्वी मालिका सोडली असली, तरी आजही प्रेक्षक दयाबेन कधी मालिकेत पुन्हा येणार, असा प्रश्न आजही विचारताना दिसतात. आता मालिकेने १८ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मालिकेत आता पुढे काय बघायला मिळणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुकतेचे ठरणार आहे.