TMKOC fame actor on Asit Modi ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेल्या १७ वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांची वेगळी वैशिष्ट्ये आहेत.

जेठालाल, मेहता, पोपटलाल, भिडे, माधवी भाभी, सोढी, टप्पू सेना यांबरोबरच अब्दुल अशा सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. या मालिकेतील अनेक डायलॉग गाजले आहेत. आता सोशल मीडियावर मालिकेतील पात्रे, संवाद यांचे मीम्स बनताना दिसतात. आता या मालिकेत अब्दुल ही भूमिका साकारणारा अभिनेता शरद संकलाने एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा रंगताना दिसत आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेता निर्माते असित मोदींबद्दल काय म्हणाला?

अभिनेता शरद संकलाने नुकतीच फिल्मीग्यानला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या संघर्षाच्या काळाबद्दल वक्तव्य केले. अभिनेता म्हणाला, “मी जेव्हा तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत काम करायला सुरुवात केली तेव्हा त्याआधी मला ७ वर्षे कोणतेही काम मिळाले नव्हते. त्यादरम्यान, असितजी मला म्हणाले की २-३ दिवसांचं काम आहे, करशील का? मला काम नव्हते, त्यामुळे त्यांनी दिलेले काम नाकारण्याचा प्रश्नच नव्हता, कारण त्यावेळी इतका संघर्ष सुरू होता की कोणत्याही ऑफिसमध्ये गेलो तर ते सांगायचे की नंतर या. अशा काळात मला असित मोदींनी काम दिले होते.”

त्यानंतर शरद संकला आजपर्यंत मालिकेत अब्दुल ही भूमिका साकारताना दिसत आहे. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या पात्राविषयी बोलायचे तर अब्दुलचे गोकुळधाम सोसायटीमध्ये दुकान आहे.

सोसायटीमधील लोकांना साहित्य पुरवण्याचे काम अब्दुल करतो. तसेच, सोसायटीमधील सर्व पुरुष रोज संध्याकाळी अब्दुलच्या दुकानात सोडा पिण्यासाठी जातात. अब्दुल सोसायटीमधील अनेक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होत असल्याचे दिसते.

दरम्यान, सध्या मालिकेमध्ये गणेशोत्सवाची तयारी चालू आहे. आता या उत्सवात काय धमाल घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.