TMKOC fame Mandar Chandwadkar On new entry in show: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत नुकतेच एक नवीन कुटुंब सामील झाले आहे. गोकुळधाम सोसायटीमध्ये नवीन राजस्थानी कुटुंबाची एन्ट्री झाली आहे.
या कुटुंबात पती-पत्नी व त्यांची दोन मुले, असे चार सदस्य आहेत. हे कुटुंब उंटावर बसून गोकुळधाम सोसायटीमध्ये आले होते. त्यामुळे त्यांच्या एन्ट्रीची चर्चा झाली होती. रूपा-रतन या जोडप्याचा मुलगा वीर हा खोडकर असल्याचे गेल्या काही भागांमध्ये पाहायला मिळले.
मंदार चांदवडकर काय म्हणाले?
आता या मालिकेत भिडेमास्तर ही भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांदवडकर यांनी नवीन राजस्थानी कुटुंबावर वक्तव्य केले आहे. त्यांनी नुकताच ‘झूम’शी संवाद साधाला. गोकुळधाम सोसायटीमधील या नवीन सदस्यांच्या एन्ट्रीवर ते गमतीने म्हणाले, “उंटावर बसून कोण येतं? लोक रिक्षा, बस किंवा टॅक्सीने येतात. पण, ते उंटावरून आले. ते आले, ते ठीक आले. पण, आल्यानंतर लगेचच त्यांचे साहित्य हरवल्याचे समजले. त्यामुळे माझी डोकेदुखी वाढली.”
पुढे अभिनेते म्हणाले, “त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सगळे खूप उत्सुक होतो. पण, त्यांच्याबरोबर ही घटना घडली, तर आम्ही आपापल्या घरीदेखील जाऊ शकत नव्हतो. त्यांनी आल्या आल्या लगेच सगळ्यांना कामाला लावले. खासकरून मला त्यांनी कामाला लावले. पण, खूप मजा येत आहे. गोकुळधाम सोसायटीमध्ये सतत काही ना काही घडत असते. इथे सहज काही मिळत नाही.”
रूपा-रतन यांचा मुलगा वीरबद्दल ते म्हणाले, “मला टप्पू सेनेमुळे लहान मुलांबरोबर कसे वागायचे, याचे प्रशिक्षण मिळाले आहे. पण, आता जनरेशन z (जेन्झी)ची मुले काय खोड्या करतात, हे मला बघावे लागेल. त्यासाठी मला तयार राहावे लागेल.”
तारक मेहता का उल्टा चश्मा या शोला २०२५ मध्ये १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. २००८ मध्ये ही मालिका सुरू झाली होती. या मालिकेतील सर्वच पात्रे लोकप्रिय आहेत. जेठालालपासून ते पोपटलालपर्यंत सर्वंच पात्रांची वेगवेगळी वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. आता या नवीन राजस्थानी कुटुंबाच्या येण्याने गोकुळधाम सोसायटीमध्ये काय गमतीजमती घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.