Former TMKOC actor questions authenticity of Asit Modi’s Raksha Bandhan: अभिनेत्री दिशा वकानीने दयाबेन हे पात्र साकारत तिची वेगळी ओळख निर्माण केली. तिने ही भूमिका अशी साकारली की प्रेक्षक दयाबेनच्या भूमिकेत तिच्याशिवाय इतर कोणाची कल्पना करू शकत नाहीत, त्यामुळेच दिशाने मालिका सोडून काही वर्षे उलटली तरीही दयाबेनच्या भूमिकेत इतर कोणतीही अभिनेत्री अद्याप दिसली नाही.

प्रेक्षकही सातत्याने मालिकेतील कलाकारांना, निर्मात्यांना दिशा वकानी मालिकेत कधी परतणार, दयाबेन ‘तारक मेहता….’ मध्ये पुन्हा कधी दिसणार, असे प्रश्न विचारताना दिसतात. तसेच, अनेकदा दिशा मालिकेत परतणार असल्याच्या, तिच्याऐवजी दयाबेनच्या भूमिकेत दुसरी अभिनेत्री दिसणार असल्याच्या चर्चा रंगताना दिसतात.

आता दिशा वकानी पुन्हा एकदा चर्चेत आली होती, याचे कारण म्हणजे ‘तारक मेहता…’चे निर्माते असित मोदींनी रक्षाबंधनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये दिशा आणि असित मोदींनी रक्षाबंधन साजरे केल्याचे पाहायला मिळाले. दिशाने असित मोदींना राखी बांधली होती.

हा व्हिडीओ शेअर करताना असित मोदींनी लिहिलेले, “काही नाती नशिबाने तयार होतात. रक्ताचे नाही तर हृदयापासून तयार झालेली काही नाती असतात. दिशा वकानी फक्त आपली दयाभाभी नाही, तर माझी बहीणसुद्धा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही एकमेकांबरोबर अनेक आठवणी तयार केल्या आहेत. एकत्र हसलो आहोत. दरम्यानच्या वर्षांत आमचे नाते स्क्रीनच्या पुढे गेले आहे. या रक्षाबंधनला तोच आपलेपणा, आमच्यातील अतूट नात्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. या नात्यातील गोडवा कायम असाच राहू दे.”

दिशा वकानी व असित मोदींच्या रक्षाबंधनच्या व्हिडीओवर अभिनेत्री काय म्हणाली?

आता यावर अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सिवालने वक्तव्य केले आहे. तिचे वक्तव्य चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने नुकतीच ‘फिल्मीग्यान’ला मुलाखत दिली.

या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, “गेल्या १७ वर्षांत दिशाने असित मोदींना राखी बांधल्याचा एकही फोटो याआधी पाहायला मिळाला नव्हता. यावेळी पूर्ण व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. स्वत:ची प्रतिमा चांगली करण्यासाठी असित मोदी हे सर्व करत आहेत.”

“दिशा असितजी यांच्या घरी गेली होती, असे लोक म्हणत आहेत. पण, दिशा त्यांच्या घरी आली नव्हती, तर असितजी आणि नीलाजी दिशाच्या घरी गेले होते. मी दिशाच्या घरी गेले होते, मला तिचं घर माहीत आहे. आता जर असित मोदींनी दिशाला फोन करून सांगितलं असेल की मी राखी बांधण्यासाठी येतोय, तर ती त्यांना नको म्हणणार नाही, कारण ती तिच्या चाहत्यांनादेखील नाही म्हणत नाही. पण, व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर करण्याचे कारण काय? त्यामध्ये दिसत होते की दिशा हसत नव्हती, ती कंफर्टेबल नव्हती.”

दरम्यान, ‘तारक मेहता…’मध्ये रोशन ही भूमिका साकारलेल्या जेनिफर मिस्त्रीने याआधी निर्माते असित मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. मालिकेत काम केलेले आणि सध्या मालिकेत नसलेले काही कलाकारही असित मोदींच्या वागणुकीबाबत अनेकदा वक्तव्य करतात.