TMKOC fame Mandar Chandwadkar expressed gratitude: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील कलाकार सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मालिकेत आलेले ट्विस्ट, खासगी आयुष्य, सोशल मीडिया यांमुळे या मालिकेतील कलाकारांची सातत्याने चर्चा होताना दिसते.
२००८ साली ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका सुरू झाली. तेव्हापासून आतापर्यंत ही मालिका अविरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेतील पात्रे आता प्रेक्षकांच्या चांगलीच ओळखीची झाली आहेत. या विनोदी मालिकेला प्रक्षकांचा उत्तम प्रतिसाददेखील मिळतो. सोशल मीडियावर मालिकेतील पात्रे, संवाद यांवर मिम्सदेखील बनताना दिसतात.
मंदार चांदवडकर काय म्हणाले?
आता मालिकेत भिडे मास्तर ही भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांदवडकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करीत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मंदार चांदवडकर म्हणाले, “नमस्कार प्रेक्षकहो, मी मंदार चांदवडकर तुम्हा सर्वांचा आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटची एकमेव सेक्रेटरी. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेला १७ वर्षे पूर्ण झाली. ही १७ वर्षे तुम्ही दिलेल्या साथीची, प्रेमाची आहेत.”
अभिनेते पुढे म्हणाले, “देवाजवळ प्रार्थना आहे की आपली ही साथ कायम अशीच राहू दे. तुमचे प्रेम आम्हाला कायम मिळत राहू दे. खूप धन्यवाद.” त्यांच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत त्यांचे अभिनंदन केले आहे. अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेकांनी ती त्यांची ही मालिका वर्षानुवर्षे कायम बघत असल्याचे म्हटले. तर काहींनी त्यांचे पात्र आवडत असल्याचे सांगितले.
या मालिकेला १७ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने निर्मात्यासह सर्व कलाकार एकत्र आले होते. यावेळी कलाकारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. काही कलाकार भावूक झाल्याचे दिसले. अभिनेता मयूर वकानीने मालिकेत सख्ख्या बहिणीबरोबर काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मयूरच्या बहिणीने म्हणजेच दिशा वकानीने दयाबेन ही भूमिका साकारली होती. दयाबेन हे पात्र दिशाने लोकप्रिय केले. मात्र, दिशाने मालिकेतून ब्रेक घेतला आणि त्यानंतर ती परत आली नाही. आजही प्रेक्षक दयाबेनची वाट पाहत असल्याचे दिसते.
१७ वर्षांच्या कालावधीत अनेक कलाकारांनी मालिका सोडली आहे. अनेक नवीन कलाकार मालिकेत आले आहेत. मात्र, नवीन चेहरे असले तरी तीच पात्रे असल्याने मालिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसते. आजही ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानी असल्याचे पाहायला मिळते.