‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत ‘रीटा रिपोर्टर’ नावाची भूमिका साकारून लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्रिया आहुजाने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने लॉकडाऊनच्या दिवसातील आठवणी सांगितल्या. तसेच ती आत्महत्या करण्याच्या मानसिक स्थितीत पोहोचली होती आणि त्यावेळी तिचा मुलगा अवघ्या काही महिन्यांचा होता, असाही खुलासा तिने केला.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर का नाकारली होती? नितीन गडकरी खुलासा करत म्हणाले, “मी तेव्हा…”
प्रिया आहुजाने ‘न्यूज १८ ‘ला सांगितलं की लॉकडाऊनचा तिच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम झाला होता. “आजही जेव्हा मी ते दिवस आठवते, तेव्हा माझ्या अंगावर शहारे येतात. लॉकडाऊन झाला तेव्हा माझा मुलगा अरदास अवघ्या काही महिन्यांचा होता. मला वाटलं की लॉकडाऊन काही दिवसात संपेल. पण नंतर आमच्या शेजाऱ्यांना कोविड झाला, लॉकडाऊन वाढत गेला आणि आमचा मजला सील झाला होता. आम्हाला घरातून बाहेर पडताही येत नव्हतं,” असं प्रिया म्हणाली.
प्रिया आहुजा पुढे म्हणाली, “मला कोविड झाला आणि आम्ही १४ दिवसांनी चाचणी केली, तेव्हा माझे रिपोर्ट्स निगेटीव्ह आले, पण माझ्या पतीचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला. ४०-४५ दिवस अशीच परिस्थिती होती, त्यातून बाहेर पडणे फार कठीण होते. पण मालव माझ्यासोबत होता, त्याच्याशी मी सर्व काही शेअर करू शकत होते. पण अशीही वेळ आली होती, जेव्हा मला मरायचं होतं, मला जिवंत राहायचं नव्हतं. पण मी मरेन की नाही या भीतीने मी आत्महत्या केली नाही. मला कायदा माहीत आहे आणि आत्महत्या करणे हा गुन्हा आहे हे मला माहीत आहे.”
पती मालव राजदाच्या पाठिंब्यामुळेच त्या परिस्थितीतून बाहेर पडू शकल्याचे प्रियाने सांगितले. “मी दुहेरी आयुष्य जगत होते, एक असे जीवन होते जिथे मी खंबीर असल्याचं नाटक करायचे, अरदासची काळजी घ्यायचे आणि इतरांसमोर आनंदी असल्याचे नाटक करायचे, पण आतून मी आनंदी नव्हते. मी भावनिकरित्या खचत होते. दुसऱ्या बाजूला दुर्बल प्रिया होती, जिला मरायचं होतं आणि तिच्या आजूबाजूला घडत असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल ती खूश नव्हती,” असं ती म्हणाली.
प्रिया आहुजाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती टीव्हीवर लहान-मोठ्या भूमिका साकारत असते. ती नुकतीच टीव्ही शो ‘गुम है किसी के प्यार में’मध्ये दिसली होती.