‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम मुनमून दत्ता तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अलीकडेच तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने फोटोग्राफर्स आणि कॅमेरामॅन यांच्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. फोटोग्राफर्स फोटो आणि व्हिडीओ काढल्यानंतर पाठीमागे वाईट कमेंट्स करत असल्याचं मुनमूनने म्हटलंय.

मुनमूनने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी तिने फोटोग्राफर्स कलाकारांबद्दल करत असलेल्या कमेंट्सवर भाष्य केलं. मुनमून म्हणाली, “मला कदाचित ते जेव्हा कमेंट्स करतात, तेव्हा ऐकू येत नाही. पण जेव्हा ते व्हिडीओ एडीट करून अपलोड करतात, तेव्हा त्यांच्या कमेंट्स स्पष्ट ऐकू येतात. हे लोक जे पाठीमागे कमेंट्स करतात ना, त्या व्हिडीओतून ऐकू येतात. त्यामुळे त्यांनी अशा वाईट कमेंट्स करणं बंद करायला पाहिजे. काहीही वाईट कमेंट्स करतात, खरं तर त्यांची कम्युनिटीच अशी झाली आहे.”

दरम्यान, मुनमूनने फोटोग्राफर्सबद्दल केलेल्या या वक्तव्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिचं समर्थन केलं आहे. “तुझं खरंय…पापराझी शेअर करत असलेल्या बऱ्याच व्हिडीओमध्ये ते सेलिब्रिटींबद्दल वाईट बोलत असतात. त्यांचेच फोटो ते काढतात आणि त्यांच्याबदद्लच वाईट बोलतात,” असं एका युजरने म्हटलंय.

मूनमून नोव्हेंबर महिन्यात युरोपला फिरायला गेली होती. त्यावेळी फिरत असतानाच तिचा अपघात झाला होता. त्यामुळे तिला तिची ट्रीप अर्धवट सोडावी लागली होती.