Bigg Boss 19 Tanya Mittal : ‘बिग बॉस’च्या घरात कायमच वाद, विवाद, भांडण आणि मतभेद पाहायला मिळतात. एखाद्या टास्कवरुन स्पर्धकांमध्ये खडाजंगी होते. त्यात स्पर्धक एकमेकांशी वाद घालताना अनेकदा वैयक्तिक आयुष्यावर टिपण्णी करतात. ‘बिग बॉस १९’ च्या नुकत्याच एका भागात असंच काहीसं झालं.

‘बिग बॉस’च्या घरात अभिनेत्री कुनिका सदानंद आणि स्पर्धक तान्या मित्तल यांच्यात जोरदार वाद झाला, ज्यामुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण केलं आणि सोशल मीडियावरही या वादाची जोरदार चर्चा रंगली आहे. गेले काही दिवस कुनीका सतत तान्याच्या प्रत्येक गोष्टीत अडवणूक करत होती. सुरुवातीला तान्याने दुर्लक्ष केलं, पण नॉमिनेशन टास्कदरम्यान प्रसंग हाताबाहेर गेला.

फ्रीप्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, या टास्क दरम्यान, कुनिकाने तान्याच्या आईबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली. ती म्हणाली, “तुझ्या आईने तुला काही शिकवलंच नाही. स्त्री असो किंवा पुरुष, काही मूलभूत गोष्टी प्रत्येक माणसाला शिकवल्या पाहिजेत, पण तुझ्या आईने तुला ते शिकवलंच नाही.”

कुनिका यांच्या या शब्दांनी तान्या खूप दुखावली गेली. तिने टास्क पूर्ण केला, पण त्यानंतर तिला अश्रू अनावर झाले. घरातले सदस्य तिला धीर देण्यासाठी आले असता, तान्याने आपल्या वडिलांकडून झालेल्या शारीरिक त्रासाबद्दल सांगितलं. यावेळी ती रडत रडत म्हणाली, “माझे वडील मला खूप मारायचे आणि तेव्हा माझी आई मला वाचवायची. मला साडी नेसण्यासाठी, घराबाहेर पडण्यासाठीही परवानगी घ्यावी लागायची.”

यानंतर ती सांगते, “वयाच्या १९व्या वर्षी माझं लग्न लावून देणार होते. तेव्हा मला असं वाटायचं की, मी मरून जावं.” तिने असंही सांगितलं की, तिच्या आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगात तिची आई तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. आईनेच तिला इथपर्यंत येणासाठी धीर दिला, स्वप्नं बघायला शिकवलं आणि परिस्थितीशी लढायला शिकवलं.

तान्या मित्तल कोण आहे?

तान्या मित्तल ही केवळ सोशल मीडिया इन्फ्लुएंसर नाही, तर एक यशस्वी उद्योजिकाही आहे. ती Handmade with Love by Tanya या नावाने हँडबॅग्स, आणि साड्यांचा स्वतःचा ब्रँड चालवते. इन्स्टाग्रामवर तिचे ३ मिलियनच्या जवळपास फॉलोअर्स आहेत. ती सोशल मीडियावरून प्रेरणादायी पोस्ट्स, आध्यात्मिक विचार आणि तिच्या व्यवसायाबद्दलची माहिती शेअर करत असते.

कुंभमेळ्यामुळे देशभरात ओळख

तान्या यावर्षी (२०२५) महाकुंभच्या काळात देशभर चर्चेत आली होती. मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला. यावेळी तनयाने त्या भयानक घटनेचा स्वतःचा अनुभव एका भावनिक व्हिडिओमध्ये शेअर केला होता, जो व्हायरल झाला.