Tejashri Pradhan Answers To Audience On Serial Remake : झी मराठी वाहिनीवर नुकतीच ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे छोट्या पडद्याबर कमबॅक करीत आहेत. या दोघांनी याआधी झी मराठी वाहिनीवरच वेगवेगळ्या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होता, त्यानंतर आता दोघे एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
तेजश्री-सुबोध एकत्र काम करणार असल्याचं जाहीर होताच प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. काहीतरी नवीन आणि खास येत असल्याच्या भावना प्रेक्षकांनी व्यक्त केल्या होत्या. अशातच मालिकेचा प्रोमो समोर आला. या प्रोमोलासुद्धा प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. एकीकडे या प्रोमोचे कौतुक होत असतानाच अनेकांनी ही मालिका ‘बडे अच्छे लगते है’ची रिमेक असल्याच्या प्रतिक्रियासुद्धा व्यक्त करण्यात आल्या.
त्याबद्दल अभिनेत्री तेजश्री प्रधानने तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘नवशक्ती’शी साधलेल्या संवादात तेजश्री या रिमेकच्या प्रतिक्रियांबद्दल असं म्हणाली, “आपली इंडस्ट्री म्हणजे केवळ मराठीच नव्हे, तर एकंदर पूर्ण मनोरंजन इंडस्ट्रीची सुरुवात एका काळात झाली आहे. सामान्यपणे आपण भावनांबद्दल बोलत आलो आहे आणि त्या भावना अश्मयुगीन काळापासूनच्या आहेत. त्या वेगवेगळ्या पद्धतीने मांडल्या जात आहेत. त्यामुळे इतकी वर्षं होऊन गेल्यानंतर आता प्रत्येक कलाकृती बघताना हे त्याच्यासारखं ते ह्याच्यासारखं असं वाटणारच.”
त्यानंतर ती म्हणाली, “आता एक रोमॅंटिक सिनेमा बनला. त्यानंतर नको बनवूयात, असं जर का आधीच्या काळात झालं असतं, तर आपण पुढे आलो असतो का? त्यात टेलिव्हिजन हे इतक्या वर्षांपासून सुरू आहे आणि ते सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे हे होणारच… पण ते मांडण्याची आणि सादर करण्याची पद्धत वेगळी असणार आहे. त्यातले बारकावे या सगळ्या गोष्टी वेगळ्या असणार आहेत. त्यामुळे हा त्याचा रिमेक आहे, याचा रिमेक आहे, असं कितीही वेळा झालं असेल तरी मी कायम सांगते की, त्या त्या भाषेची संस्कृती वेगळी असते. जडणघडण वेगळी असते. सण-समारंभ वेगळे असतात आणि ते साजरे करण्याच्या पद्धतीसुद्धा वेगळ्या असतात.”
पुढे तेजश्री म्हणते, “कदाचित तुम्हाला असं वाटेल की, हे तिकडे झालं होतं आणि हे आता इकडेही चालू आहे; पण ते सादर करण्याची पद्धत नक्कीच वेगळी असते. आज आपल्याकडे अनेक वाहिन्या चालवणारे लोक आहेत. एखाद्या भाषेत गाजलेली गोष्ट आपल्याला दुसरी भाषा बोलणाऱ्या लोकांपर्यंत द्यायची इच्छा होत असेल, तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि ती आपण छान पद्धतीने स्वीकारली पाहिजे. कोणीतरी कोणाला तरी कॉपी करत आहे म्हणजे आपण जसंच्या तसं कॉपी करणार आहोत का, तर नाही… गुजराती नाटक बघतानाचा विनोद आपल्याला परिचयाचा वाटणार नाही किंवा मराठी माणसांचा विनोद गुजराती माणसाला परिचयाचा वाटणार नाही, तर हा फरक कायम असणार आहे. त्यामुळे हे त्याच्यासारखं वाटतंय, हे याच्यासारखं वाटतंय… हे होत राहणार. पण, तरीसुद्धा त्यातून काहीतरी वेगळेपण काढण्यासाठी अनेक क्रिएटिव्ह लोक काम करत असतात आणि ते करण्याचा प्रयत्न कायमच असणार आहे.”
त्यानंतर तेजश्री म्हणाली, “पहिला प्रोमो आल्यानंतर याचा रिमेक, त्याचा रिमेक अशा अनेक कमेंट्स आल्या. पण माझं म्हणणं आहे की, ती कलाकृती एकदा पाहा तरी…. एखादी गोष्ट सारखीच वाटली, तर अविश्वास नका दाखवू; त्या कलाकारांवर आणि कलाकृतीवर विश्वास दाखवा.”
याचबद्दल पुढे सुबोध म्हणाला, ” ‘तुला पाहते रे’ मालिकेचा आता हिंदीमध्ये रिमेक होत आहे आणि याबद्दल त्यांनी अधिकृतरीत्या सांगितलं आहे. तसंच ही (वीण दोघांतली ही तुटेना) मालिकासुद्धा रिमेक असती, तर झी मराठी इतकी मोठी वाहिनी आहे. त्यांनी अधिकृतपणे नक्कीच ते सांगितलं असतं. ज्या अर्थी त्यांनी हे सांगितलेलं नाही, त्याअर्थी ही गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे आपण आता पुढे बघूया…”