Tejashri Pradhan Shared A Video With Gaurav More : तेजश्री प्रधान एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत ती स्वानंदी ही मुख्य भूमिका साकारणार आहे. अशातच आता अभिनेत्रीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, यामध्ये तिच्यासह अभिनेता गौरव मोरे पाहायला मिळत आहे.
तेजश्री प्रधान व सुबोध भावे लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत या दोघांव्यतिरिक्त इतर बऱ्याच लोकप्रिय मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. अशातच आता अभिनेत्रीने या मालिकेसंदर्भात एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गौरव मोरे पाहायला मिळत आहे.
तेजश्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओला तिने “कांदेपोह्याच्या कार्यक्रमाला आलेत गौरव शेठ, स्वानंदीसोबत त्यांची वीण जुळेल का हो थेट? स्वानंदीची वधू परीक्षा” असं कॅप्शन दिलं आहे. यामध्ये गौरव तिला तुमचं नाव, तुम्ही काय करता असे प्रश्न विचारतो. यावर ती, “मी एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये पीएचडी केली आहे आणि टुरिस्ट कंपनीत नोकरीसुद्धा करते” असं म्हणते. यावर तो म्हणतो, “म्हणजे १२ वी राहिली आहे तुमची.” यानंतर स्वानंदी त्याला तुमचं शिक्षण किती झालं आहे असं विचारते. यावर तो तिच्या प्रश्नाचं उत्तर न देता तुमचं घरं छान आहे. एकदम सुटसुटीत असं म्हणतो. यानंतर स्वानंदी त्याला चहासाठी विचारते.
“गौरव मला कॉफी आवडते, फिल्टर कॉफी असं म्हणतो.” स्वानंदी त्याला कॉफीची वेगवेगळी नावं सांगते, परंतु तो त्याकडे दुर्लक्ष करून तिच्या घरातील इतर गोष्टींचं कौतुक करतो. पुढे गौरव स्वानंदीला दुसरं काहीतरी विचाराना असं म्हणतो. यानंतर स्वानंदी व गौरव शेठ यांच्यामध्ये बराच वेळ संवाद सुरू असल्याचं पाहायला मिळतं. एकूणच गौरवच्या बोलण्यामुळे आणि त्याची उत्तरं ऐकून स्वानंदी वैतागते आणि शेवटी गौरवला तिथून निघायला सांगते आणि पुढे म्हणते “रमी शेठ? चकली चोरुन गेला तो.”
या व्हिडीओखाली अनेकांनी कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने यामध्ये “गौऱ्या दादाला बघून हसू येत आहे मला व्हा तेजू” असं म्हटलं, तर दुसऱ्याने “ही जोडी आवडली राव आम्हाला” अशी कमेंट केलीये; तर अजून एका नेटकऱ्याने “ही मालिका खूप खास असणार आहे, संपूर्ण महाराष्ट्र या मालिकेवर प्रेम करणार आणि लोकांना लग्नाविषयी एक चांगला मेसेज मिळणार, अभिनंदन आणि शुभेच्छा!”

दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिका उद्या ११ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. सोमवार ते शनिवार ही मालिका संध्याकाळी ७:३० वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या मालिकेतून तेजश्री ‘झी मराठी’वर परतणार असून तिच्यासह यामध्ये अनेक कलाकारांची वर्णी लागली आहे, त्यामुळे मालिका पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असलेली पाहायला मिळतेय.