‘बिग बॉस मराठी ३’च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्री मीरा जगन्नाथ(Mira Jagannath)ने तिच्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधले होते. स्पष्टवक्ती असलेल्या मीराने या पर्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. याशिवाय अभिनेत्री ‘माझ्या नवऱ्याची बायको ‘, ‘ठरलं तर मग’ अशा प्रसिद्ध मालिकांमध्ये काम करताना दिसली होती. याबरोबरच अभिनेत्री काही म्युझिक व्हिडीओमध्येही काम करताना दिसली आहे. आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याविषयी मोठे वक्तव्य केले आहे. तिने तिचा साखरपु़डा का मोडला होता, याचा खुलासा केला आहे.

मीरा जगन्नाथ काय म्हणाली?

मीरा जगन्नाथने नुकताच ‘नवशक्ती’बरोबर संवाद साधला. यावेळी प्रेमात केलेला सर्वात मोठा वेडेपणा कोणता? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर बोलताना मीराने म्हटले की, माझा जो बॉयफ्रेंड होता, त्याला लग्न करणं जमत नव्हतं. तर मी त्याला म्हटलं की ठीक आहे, मी आयुष्यात पुढे जाते. त्यानंतर माझं दुसऱ्या मुलाबरोबर लग्न ठरलं. आधी साखरपुडा होता आणि एका आठवड्यानंतर लग्न होतं. त्यावेळी माझा बॉयफ्रेंड परत माझ्या आयुष्यात आला. मला विमानतळावरचे फोटो पाठवले व मला म्हटला की, मी आलो आहे तू लग्न करू नकोस. त्याने तसे म्हटल्यानंतर मी साखरपुडा मोडला. बाबा चिडले वगैरे, या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर मी पुन्हा मुंबईत आले, तर तो मुलगा परत गायब झाला. गायब म्हणजे दोन-तीन महिने बोलला आणि पुन्हा तो नाही म्हणाला. माझी आई परत नाही म्हणतेय असे त्याने मला सांगितले. असे म्हणत बॉयफ्रेंडसाठी साखरपुडा मोडला होता, असे मीराने सांगितले आहे.

अभिनेत्री मीरा जगन्नाथ अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरील तिच्या फोटोंमुळेही अनेकदा चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे. मीरा बऱ्याचदा सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दिसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मीरा जगन्नाथ लवकरच ‘इलू इलू’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील तिची भूमिका नेमकी कशी असणार, तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू 1998’ हा मराठी चित्रपट ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मीराबरोबर एली अवराम, ओराह वेलणकर, वीणा जामकर, अंकिता लांडे, वनिता खरात, निशांत भावसार, श्रीकांत यादव हे कलाकार दिसणार आहेत.