Tharala Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत काही दिवसांपूर्वीच सुभेदारांच्या घरात प्रियाच्या खऱ्या आई-बाबांचं म्हणजेच सदाशिव-मैनावतीचं आगमन झाल्याचं पाहायला मिळालं. पण, सदाशिव आणि मैना काकू सायलीचे आई-बाबा आहेत असा गैरसमज अर्जुनसह सगळ्या सुभेदारांचा झालेला आहे. खरंतर, सायलीच्या आणि मैनावतीच्या स्वभावात प्रचंड तफावत असते. त्यांचे स्वभाव अगदी विरुद्ध आहेत, याची जाणीव अर्जुनला होते.

अर्जुन सायली अन् मैनावतीची DNA टेस्ट करतो. मात्र, ऐनवेळी प्रिया हे रिपोर्ट्स बदलते आणि अर्जुनला समोर असलेल्या रिपोर्ट्सवर विश्वास ठेवावा लागतो. दुसरीकडे, सायली मात्र हे आपले खरे आई-बाबा नाहीत यावर ठाम असते. सायलीला बागेत काम करायची आणि स्वयंपाकाची प्रचंड आवड असते. तिचा स्वभाव खूप शांत असतो पण, मैनावती एकदम उलट वागत असते. अस्मिता सुद्धा एकदा नकळतपणे मैना काकू सायलीच्या कमी आणि प्रियाच्या आई जास्त वाटतात असं बोलून जाते.

आता सायलीने आपले खरे आई-बाबा कोण आहेत हे शोधून काढायचं असा निश्चय केलेला आहे. त्यामुळे सगळ्यात आधी ती मैनावती व सदाशिव यांच्या घराच्या चाव्या मिळवते. यादरम्यान, प्रिया सायलीच्या वाटेत अनेक अडचणी निर्माण करेल. पण, अखेरीस सर्वात मोठं सत्य सायलीसमोर उघड होणार आहे.

सायली हतबल होऊन कोमात असलेल्या मधुभाऊंना भेटायला रुग्णालयात जाते. यावेळी तिच्याबरोबर सदाशिव व मैनावती देखील असतात. ते मधुभाऊंना भेटून बाहेर जातात. तर, दुसरीकडे सायली मधुभाऊंसमोर आपलं मन मोकळं करू लागते.

“मधुभाऊ तुम्हीच सांगा आता तुम्हाला भेटून गेलेल सदाशिव व मैनावती माझे आई-वडील नाहीयेत ना?” यानंतर मधुभाऊ डोळ्यांची उघडझाप करतात. पुढे, सायली त्यांना म्हणते, “हे माझे खरे आई-बाबा नसतील तर पुन्हा एकदा इशारा करा मधुभाऊ…” लेकीची हाक ऐकताच मधुभाऊ तिला डोळ्यांनी इशारा देतात आणि सदाशिव-मैनावती आपले आई-वडील नाहीत याची सायलीला खात्री होते.

सायली प्रचंड खूश होते कारण, तिची शंका खरी ठरते. आता सायलीसमोर सगळ्यात मोठ्या सत्याचा उलगडा झाल्यावर मालिकेत पुढे काय घडणार? सायली याबद्दल अर्जुनला कसं सांगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग १७ आणि १८ नोव्हेंबरला रात्री ८:३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित केला जाईल.