Tharala Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत अखेर सायलीसमोर सदाशिव व मैनावती तिचे खरे आई-बाबा नाहीयेत याचा उलगडा झालेला आहे. सदाशिव व मैनावती यांच्या स्वभावाला सायली कंटाळलेली असते. माझे आई-बाबा असे असूच शकत नाहीत याची तिला खात्री असते. मात्र, डीएनए रिपोर्ट्स मॅच झाल्यामुळे सायली हतबल होते. आता मधुभाऊच आपल्याला खरं सांगू शकतात याची जाणीव तिला असते. म्हणूनच सायली सदा व मैना यांना घेऊन रुग्णालयात जाते.

सदाशिव व मैनावती मधुभाऊंना भेटून बाहेर गेल्यावर सायलीला अश्रू अनावर होतात. ती मधुभाऊंच्या जवळ जाऊन विचारते, “तुम्ही मला इशाऱ्याने तरी सांगा हे खरंच माझे आई-बाबा आहेत का? जर हे माझे आई-बाबा नसतील तर तुम्ही मला एक इशारा करा” यानंतर मधुभाऊ डोळ्यांची उघडझाप करतात. यामुळे सायलीला विश्वास बसतो की हे दोघंही तिचे आई-बाबा नाहीयेत. तिची शंका खरी ठरते. अर्जुनला सुद्धा समाधान वाटतं कारण, त्यालाही सदाशिव व मैनावती आवडत नसतात. तो सायलीला धीर देतो…दोघंही आता सदा व मैना यांना चांगलाच धडा शिकवायचा असा निर्णय घेतात.

घरी आणल्यापासून सदा व मैनाला आपण खूप पाठिशी घातलं आता नाही, असा निश्चय सायली करते. दुसरीकडे, सदाशिव व मैनावती सुभेदारांच्या घरी पोहोचून मोठा कट रचतात. पूर्णा आजीला कॉफीत गुंगीचं औषध देऊन तिला बेशुद्ध केलं जातं. सदाशिव व मैनावती गुपचूप पूर्णा आजीला बेडवर झोपवतात. आधीच वय झालेलं आहे आणि त्यात कॉफीत गुंगीचं औषध मिसळून दिलं असल्याने पूर्णा आजीची शुद्ध हरपते…हाच डाव साधून सदाशिव व मैनावती पूर्णा आजीचं कपाट उघडतात. सगळे दागिने, मौल्यवान वस्तू काढून एका गाठोड्यात भरतात आणि चोरी करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतात. या दोघांनी चोरांसारखे काळे कपडे घालून तोंड झाकलेलं असतं.

आपल्या घराच्या आजूबाजूला कोणीतरी वावरतंय हे पाहून सायली जोरात ओरडते तोच सगळे सदाशिव व मैनावतीच्या मागे धावतात. सायलीने वेळीच हुशारीने दोघांचीही सावली पाहिल्याने त्यांना बंगल्याच्या आत पकडण्यात अर्जुनला यश मिळतं. यानंतर दोघांच्या चेहऱ्यावरचे मास्क हटवल्यावर सदाशिव-मैनावतीचं खरं रूप सर्वांसमोर उघड होतं.

आता सदाशिव-मैनावतीबाबत अर्जुन काय निर्णय घेणार? पूर्णा आजीची प्रकृती कशी असेल? सायली आता पुढे काय करणार? हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.