Jui Gadkari Share Her Bond With Mdhubhau : अनेक कलाकार हे त्यांच्या अभिनयानं पडद्यावरील खोटी नातीसुद्धा प्रेक्षकांना खरी असल्याचं भासवून देतात. अर्थात, यामागे कलाकारांचा कसदार अभिनय असतोच; पण पडद्यावरील कलाकारांचं एकमेकांबरोबर ऑफस्क्रीन असलेलं नातंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. एखाद्या मालिकेतील कलाकारांचं नातं प्रेक्षकांना तेव्हाच खरं वाटतं, जेव्हा या कलाकारांचं प्रत्यक्ष आयुष्यातही एकमेकांबरोबर खास बॉण्डिंग असतं. असंच खास नातं आहे, ‘ठरलं तर मग’ मालिकेमधील मधुभाऊ आणि सायलीचं.
मधुभाऊ आणि सायली ही बाप-लेकीची जोडी पडद्यावर जितकी सुंदर दिसते, तितकीच ती प्रत्यक्ष आयुष्यातही आहे. प्रत्यक्ष आयुष्यातही सायली आणि मधुभाऊ म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेते नारायण जाधव यांचं बाप-लेकीसारखं नातं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत जुई गडकरी आणि नारायण जाधव यांनी त्यांच्या प्रेमळ नात्याबद्दल सांगितलं. सिनेचित्र या यूट्यूब वाहिनीशी साधलेल्या संवादात दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल भावना व्यक्त केल्या.
यावेळी जुई असं म्हणाली, “मधुभाऊ म्हणजे नारायणमामा… मी त्यांना नारायण मामा म्हणते. त्यांच्याबरोबर मी २०१२-१३ साली काम केलं होतं. त्यामुळे आमची मैत्री जुनी आहे. तेव्हा मी त्यांना असं म्हटलेलं की, मामा मला तुमच्याबरोबर पुन्हा काम करायचं आहे. त्यानंतर १९ जुलै २०२२ रोजी मला पहिल्यांदा कळलं की, माझं ‘ठरलं तर मग’साठी कास्टिंग झालं आहे आणि माझ्या वडिलांचं काम नारायण मामा करत आहेत तेव्हा त्यांना लगेच फोन केला होता. आमच्यात खूप छान मैत्री आहे. मी त्यांच्याबरोबर कोणत्याही गोष्टीवर बोलू शकते आणि चर्चाही करू शकते.”
पुढे ती म्हणते, “नारायणमामा कधी बाबा म्हणून ओरडतात; तर कधी मित्र म्हणून गप्पा मारतात, समजून घेतात. त्यामुळे मालिकेत ते माझे बाबा आहेत हे कळलं तेव्हा खूप भरून आलं होतं. मला खूप छान वाटलं. सायली आणि मधुभाऊ यांचं नातं सर्व प्रेक्षकांना इतकं आवडण्याचं कारणच हे आहे की, आमचं वैयक्तिक नातंसुद्धा तितकं छान आहे. मी सेटवर नेहमीच सगळ्यांना हे बोलत असते की, ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनसुद्धा मी त्यांची आवडती मुलगी आहे. माझी त्यांना खूप काळजी असते. नेहमी ते कॉल, मेसेज करीत विचारपूस करणं, माझ्यासाठी देवळात प्रार्थना करणं ही माझ्यासाठी भावनिक गोष्ट आहे.”
जुई गडकरी इन्स्टाग्राम पोस्ट
त्यानंतर नारायण जाधव यांनी जुईबद्दल असं म्हटलं, “आम्ही मालिकेत जे जे प्रसंग केले आहेत, मग ते अगदी पाच किंवा सात मिनिटांचे असतील, ते सगळे वन-टेक केले आहेत. हे मी अभिमानाने सांगू शकतो की, आमचे जास्त रिटेक होत नाहीत. काही तांत्रिक गोष्टी असतील तरच… नाही तर आम्ही सगळे प्रसंग एकाच टेकमध्ये करतो. कारण- आम्हा दोघांना माहीत असतं की, कोण कुठे कशा पद्धतीनं व्यक्त होणार आहे. समोरच्याला किती वेळ द्यायचा, मग आपण कधी संवाद म्हणायचा, हे सगळं आमच्यात छान पद्धतीनं होतं. त्यामुळे एखादा प्रसंग केलाय, असं वाटतच नाही. आम्ही सगळेच सीन अगदी उत्स्फूर्तपणे करतो. त्यामुळे आमच्यात केवळ मालिकेत लेक आणि वडिलांचं नातं नाही, तर प्रत्यक्षातही तसं नातं आहे.”