Tharla Tar Mag Fame Amit Bhanushali : अमित भानुशाली मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या तो ‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे चर्चेत आहे. अमित याव्यतिरिक्त सोशल मीडियावरही सक्रिय असतो. त्यामार्फत तो त्याच्या कुटुंबाबरोबरचे अनेक व्हिडीओ व फोटो शेअर करीत असतो.
अमितनं नुकतीच गणेशोत्सवानिमित्त ‘कलाकृती मीडिया’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्याच्याबरोबर त्याची आई व बायकोही उपस्थित होती. त्यानं त्याच्या बायको व आईच्या पाठिंब्यामुळे तो इथपर्यंत पोहोचू शकला. त्याला त्याचं अभिनेता होण्याचं स्वप्न पूर्ण करता आलं याबद्दल सांगितलं आहे. यासह त्यानं व त्याच्या बायकोनं एकत्र कुटुंबाबद्दल, तसेच आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडणाऱ्यांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवू नका – अमित भानुशाली
मुलाखतीत एकत्र कुटुंब व आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडणाऱ्यांबद्दल अमित म्हणाला, “आज बऱ्याच ठिकाणी बघतो मी की, आई-वडिलांना त्यांची तब्येत फार बरी नसेल किंवा ते आजारी असतील, तर सगळेच नाही; पण काही जण त्यांना वद्धाश्रमात ठेवतात. त्यामुळे मी सगळ्यांना एकच सांगेन की, आई-वडील आजारी आहेत म्हणून तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात ठेवू नका. कारण- तुम्ही लहान असताना आजारी असायचा तेव्हा तुम्हाला त्यांनी अनाथाश्रमात टाकलं नव्हतं. त्यावेळी त्यांनी तुम्हाला प्रेमानं सांभाळलं. आता तुमची जबाबदारी आहे की, तुम्हालासुद्धा त्यांना तितक्याच प्रेमानं सांभाळायचं आहे. त्यामुळे त्यांची काळजी घ्या.”
अमितची बायको श्रद्धा भानुशालीसुद्धा एकत्र कुटुंबाबद्दल म्हणाली, “हल्ली आम्ही बघतो की, नवरा-बायकोला वेगळं राहायचं असतं. त्यांना त्यांचं कुटुंब तयार करायचं असतं. आई-वडील वेगळ्या ठिकाणी राहतात. नवरा-बायको वेगळ्या ठिकाणी राहतात. माझं खरंच मनापासून असं म्हणणं आहे की, एकत्र राहा. मोठ्यांचे संस्कार आपल्यावर आणि मुलांवर असणं खूप गरजेचं आहे. आई-वडिलांबरोबर राहा, तुमच्या मुलांना त्यांच्याबरोबर वाढवा. मुलांना आई-वडिलांची गरज असते तशीच आजी-आजोबांचीही गरज असते आणि ते नातंच वेगळं असतं.”
दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त अमितच्या घरीसुद्धा बाप्पाचं आगमन झालेलं आहे. दरवर्षी अमितच्या घरी बाप्पा येतात. तो यादरम्यान त्याच्या कुटुंबाबरोबरचे फोटो व व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट करीत असतो. या मुलाखतीत त्यानं गणपती बाप्पामुळे त्याला खूप बळ मिळालं आणि त्यांच्या आशीर्वादानं तो एवढं सगळं करू शकला, असं सांगितलं आहे.