Tharla Tar Mag Fame Jui Gadkari Shares Health Update : जुई गडकरी या ना त्या कारणाने कायम चर्चेत असते. ती तिच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळेही विशेष चर्चेत असताना दिसते. अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रिय असल्याने तिचा तिथेही मोठा चाहतावर्ग आहे. त्यामार्फत ती तिच्या दैनंदिन जीवनातील गोष्टी शेअर करत असते. अशातच आता जुईने तिची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल व्हावं लागल्याचं सांगितलं आहे.

छोटा पडदा प्रेक्षकांच्या मनोरंजनाचं महत्त्वाचं साधन मानला जातो. त्यामार्फत दररोज त्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांना मालिकांमधून पाहता येतं. परंतु, मालिकांचं चित्रीकरण दररोज १३-१४ तास सुरू असतं. त्यामुळे प्रकृती बिघडली तरी काही वेळा कलाकारांना रजा घेता येत नाही. जुई गडकरीनंसुद्धा याबाबत व तिच्या प्रकृतीबद्दल सांगितलं आहे.

जुईनं ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये तिनं तिच्या प्रकृतीबद्दल सांगितलं आहे. तिची प्रकृती बरी नसल्यानं सेटवर तिची आई आल्याचंही तिनं म्हटलं आहे. जुई यामध्ये म्हणाली, “प्रकृती नरम-गरम असली की, आई माझ्याबरोबर सेटवर येते. त्यामुळे आतासुद्धा ती त्यानिमित्तच आली आहे”. यासह जुईच्या आई नेत्रा गडकरी यांनीसुद्धा “तिची प्रकृती बरी नसते तेव्हा मी नेहमी तिच्याबरोबर सेटवर येते. तिला औषधं वगैरे वेळेवर द्यावी लागतात. आता दोन दिवसांपूर्वी ती अॅडमिट होती. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून मी आलीये तिच्याबरोबर”, असं सांगितलं आहे.

जुईला मुलाखतीमध्ये तिच्या प्रकृती बिघडण्यामागचं कारण विचारण्यात आलं. त्यावर ती म्हणाली, “सध्या व्हायरल सगळीकडेच सुरू आहे, त्यामुळे तब्येत थोडी नरम-गरम होतीच. आमच्या सेटवरही बरेच जण आजारी आहेत. मला त्यात टायफॉइड झाला होता. माझ्या शरीरात तो बऱ्याच दिवसांपासून होता; पण डिटेक्ट झाला नाही. नंतर तो डिटेक्ट झाल्याचं कळलं तेव्हा ताप खूप वाढला होता. मग मला जावंच लागलं. घरी गेले नंतर अॅडमिट झाले होते आणि आता परत कामावर रुजू झाले आहे”.

जुई पुढे म्हणाली, “गेला दीड महिना माझी प्रकृती जरा बिघडलेलीच आहे. ताप येणं-जाणं सुरूच होतं. पण त्या दिवशी सेटवर असताना जो ताप आला, तो खूपच होता. कारण- १०२, १०३ इतका ताप होता त्यामुळे मला सेटवरून जावंच लागलं. मी उभी राहू शकत नव्हते. चेहरा सुजला होता, डोळ्यांतनं पाणी यायचं, तेव्हा खूपच त्रास झाला होता”.

जुई पुढे तिच्या आईबद्दल म्हणाली, “आई आली की, महत्त्वाचं म्हणजे मला नीट झोप मिळते. जे एकटे राहतात, ते समजू शकतात. कारण- रात्री झोपताना आपण विचार करत असतो. उद्या भाजी कुठली करायचीये, काय कामं राहिली आहेत. यातच रात्र निघून जाते आणि पॅकअप झाल्यानंतर पुन्हा मी या विचारात असते की, हे आवरायचंय ते करायचंय. त्यामुळे मानसिकरीत्या मी सतत विचार करत असते. पण आई आली की, जरा या गोष्टींचा ताण कमी होतो. मला शांत वाटतं”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुई पुढे मालिकेच्या चित्रीकरणाबद्दल म्हणाली, “मालिकांचं शूटिंग दररोज १३-१४ तास सुरू असतं; पण सुदैवानं आमच्या मालिकेचं शूटिंग १२ किंवा साडेबारा तासांत संपतं. आमचं पॅकअप होतं. आमच्याबरोबर या मालिकेच्या सेटवर असं कधी झालं नाही की, मालिकेत महत्त्वाचे भाग प्रदर्शित होत असताना खूप प्रेशर आलं आहे किंवा ताण वाढला आहे. आम्ही आमच्या ठरलेल्या वेळेतच शूट करीत आहोत. नियोजन व्यवस्थित आहे. त्यामुळे सगळं नीट सुरू आहे”.