Tharala Tar Mag Monika Dabade: ‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुनची बहीण अस्मिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका दबाडे मालिकेत परतली आहे. मोनिकाने आई झाल्याने काही काळ मालिकेतून ब्रेक घेतला होता, आता ती तिच्या चिमुकल्या लेकीला घेऊन परत शूटिंग करत आहे. तिने फेसबूकवर काही फोटो पोस्ट करून ती ‘ठरलं तर मग’चं शूटिंग करत असल्याची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली होती.

मोनिका दबाडेने “आवडत्या लोकांसोबत, जगातल्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीला घेऊन, आवडतं काम करायला मिळणं, यासाठी भाग्य लागतं ..!!!” असं कॅप्शन देत सेटवरील फोटो पोस्ट केले होते. फोटोत ती तिच्या चिमुकलीला जवळ घेऊन दिसत होती. तसेच अर्जून, सायली व मालिकेतील इतर सदस्यांबरोबरचे फोटो तिने शेअर केले होते. ‘नकारात्मक कमेंट्सकडे दुर्लक्ष, आपल्या आपल्या कामाकडे लक्ष !!!’ असं तिने लिहिलं होतं. तिच्या या पोस्टवर एका युजरने केलेल्या कमेंटला मोनिकाने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.

‘बंद कर तुझा नाटकीपणा, सरळ सरळ बोल ना पैशांसाठी करतेय’, अशी कमेंट एका महिलेने मोनिकाच्या पोस्टवर केली होती. तिला मोनिकाने सुनावलं आहे. “हो. पैशांसाठी करते. फुकट का करेन? स्वाभाविक आहे. तुम्हाला काय वाटलं? मला ईएमआय भरावा लागतो. बाकी तुमचं सगळं उत्तम चाललंय ना?” असं मोनिका या युजरला म्हणाली.

मोनिकाने कमेंटला दिलं उत्तर

monika dabade slams user trolled her for working after daughter birth
मोनिका दाबाडेने महिलेला दिलं उत्तर (फोटो – फेसबूक)

इतरही काही जणांनी मोनिकाच्या या पोस्टवर नकारात्मक कमेंट्स केल्या होत्या, त्यांनाही तिने उत्तर दिलं. तर काही जणांनी मोनिका मालिकेत परतल्याने आनंद व्यक्त केला आहे. ‘तुझे काम खरंच खूप उत्तम आहे. तुझ्याशिवाय मालिका अधुरी वाटत होती. लोकांकडे लक्ष देऊ नको. खूप कमी लोकांना आवडते काम आपल्या बाळासोबत करायला मिळते, तू लकी आहेस आणि हे जे तू धाडस दाखवलेस त्यामुळे तुझं बाळ तुझ्यावर नक्की proud feel करेल. बाकी अभिनंदन,’ असं म्हणत एका युजरने मोनिकाचं कौतुक केलं.

मोनिकाने प्रेग्नेन्सीमुळे मालिकेतून ब्रेक घेतल्यावर अस्मिता (ती साकारत असलेले पात्र) तिच्या नवऱ्याकडे बाहेरगावी राहायला गेली असं मालिकेत दाखवण्यात आलं होतं. आता मोनिका परतल्याने येत्या काळात ‘ठरलं तर मग’ मालिकेत अनेक नवीन ट्विस्ट पाहायला मिळतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मोनिका १५ मार्च २०२५ रोजी आई झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि तिने मुलीचं नाव वृंदा असं ठेवलं. मोनिका सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. आई झाल्यापासून ती तिच्या लेकीबरोबरचे सुंदर क्षण चाहत्यांबरोबर शेअर करत होती. आता ती वृंदा व मालिकेतील इतर सहकाऱ्यांबरोबरची मजा-मस्ती सोशल मीडियावर शेअर करत असते.