Tharla Tar Mag Fame Monika Dabade Talks About Her Pregnancy Journy : ‘ठरलं तर मग’मध्ये अस्मिता हे पात्र साकारणारी अभिनेत्री मोनिका दबाडेने काही महिन्यांपूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला. यासाठी तिने काही काळ मालिकेतून ब्रेक घेतला होता. अशातच आता अभिनेत्रीचं काही दिवसांपूर्वीच मालिकेत पुनरागमन झालं होतं. मोनिकाने मालिकेतील तिच्या पुनरागमनाबद्दल सांगितलं आहे.

मोनिकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये गरोदरपणानंतर मालिकेत परतणं तिच्यासाठी किती आव्हानात्मक होतं याबद्दल सांगितलं आहे. तिने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये तिला गरोदरपणानंतर पुन्हा मालिकेत कमबॅक करायचा आहे हे तुला माहीत होतं, यासाठी तू कशी तयारी केली होतीस याबाबत विचारण्यात आलेलं.

मोनिका यावर म्हणाली, “अगदी खरं सांगायचं तर मी खूप रडली आहे. लोकांना वाटेल की हे सोप आहे, पण अजिबात तसं नाहीये. खूप रडले होते, खूप वाईट वाटलं होतं की, मला पूर्ण वेळा तिला देता येणार नाही. पण, ती समजून घेईल याबाबत मला विश्वास होता, कारण बाळ कसं आहे हे कळतं. त्रास देणारं आहे का किंवा माझ्याशिवाय राहू शकत नाही का वगैरे, पण ती अजिबात तशी नाहीये.”

मोनिका पुढे कामावर परतण्याबद्दल म्हणाली, “मी सव्वा महिन्यानंतरच सांगितलं की मी काम सुरू करणार आहे आणि दोन महिने पूर्ण झाल्यानंतर लगेच मी काम सुरू केलं, म्हणून कदाचित एवढ्या लवकर सुरू केल्यानेही तिला इथली सवय झाली. त्यामुळेच मला काम करण्याचं बळ मिळतं. मालिकेसाठी माझं फक्त ९ ते १० दिवसांचं शूटिंग असतं. तेवढेच दिवस मी काम करते ३० दिवस मी शूटिंग करत नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोनिका पुढे म्हणाली, “जेवढे ९ ते १० दिवस असतात त्यात माझी तारांबळ होते. सहा वाजता उठायचं, स्वत:चा डब्बा बनवायचा, तिला अंघोळ घालायची. तिचं सगळं बघायचं हे सगळं करून मला काही झालं तरी ९ वाजता निघावंच लागतं. मग १० पर्यंत आम्ही इथे येतो. मला निर्मिती संस्थेचे आभार मानायचे आहेत की, दिवाळीपर्यंत मी त्यांना १० ते ७चं काम करणार असं सांगितलेलं आणि त्यांनी याला मान्यता दिली. फक्त सकाळच्या वेळीच माझी तारांबळ होते, बाकी सीन करताना मला खूप मज्जा येते. मी खूप उत्सुक असते. मला काम करायला आवडतं, त्यामुळे सगळं होऊन जातं.”