Tharla Tar Mag Fame Actor : ‘ठरलं तर मग’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. त्यामध्ये अभिनेत्री जुई गडकरी व अमित भानुशाली मुख्य भूमिका साकारत आहेत. या दोघांसह मालिकेतील इतर कलाकारांचीसुद्धा प्रेक्षकांमध्ये बरीच क्रेझ आहे. प्रेक्षक अनेकदा सोशल मीडियामार्फतही त्यांना प्रतिसाद देत असतात. अशातच मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या एक कलाकाराने नुकतेच मालिकेतील सीनमुळे त्याच्यासह घडलेला एक किस्सा सांगितलं आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेत अनेकदा कोर्ट सीन दाखवले जातात. मुख्य नायक (अर्जुन सुभेदार) मालिकेत स्वत: वकील असल्याने या संदर्भातील गोष्टी अनेकदा प्रेक्षकांना पाहायला मिळतात. अशातच यामध्ये अभिनेते सागर तळाशीकरसुद्धा रविराज किल्लेदार ही वकिलाची भूमिका साकारत आहेत. त्यांनी नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली आहे.

सागर तळाशीकर यांनी मालिकेतील सीनमुळे त्यांना खऱ्या आयुष्यातील त्यांच्या एका वकील मित्राचा फोन आल्याचं सांगितलं आहे. सागर तळाशीकर यांनी अभिनयाव्यतिरिक्त वकिलीचं शिक्षणसुद्धा घेतलं असल्याचं मुलाखतीमधून सांगितलं आहे. त्यामध्ये त्यांना “मालिकेत सीन करताना कधी तुमच्यातील वकील जागा होतो का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता.

सागर तळाशीकर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाले, “मी मालिकेत काम करताना माझ्यातील खऱ्या वकिलाला कधी जागा होऊ देत नाही. बऱ्याचदा असं होतं की, मालिकेतील सीन पाहिल्यानंतर जिथून मी वकिलीचं शिक्षण घेतलं आहे तेथील माझ्याबरोबरचे विद्यार्थी जे आता नामांकित वकील आहेत, त्यांचे बऱ्याचदा मला फोन येतात आणि ते म्हणतात की, आम्ही मालिकेत कोर्ट सीन पाहिला त्यात असं असं दिसलं, ते खरंच असं असतं का असं, ते मला मुद्दाम मस्करी करीत म्हणतात आणि माझी थट्टा करतात”.

सागर तळाशीकर पुढे म्हणाले, “मालिकेतील कोर्ट आणि खऱ्या आयुष्यातील कोर्ट यांच्यामध्ये खूप तफावत असते. मालिकेत ड्रामा हवा असतो म्हणून त्यानुसार ते सगळं दाखवलं जातं, जेणेकरून त्याला प्रेक्षकांचा अधिक प्रतिसाद मिळावा. मूळ कोर्टामध्ये अत्यंत शांततेमध्ये काम सुरू असतं. इतके वादविवाद नसतात; पण मालिकेत मात्र आपल्याला ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करावं लागतं”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सागर तळाशीकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी आजवर अनेक मालिका-चित्रपटांतून काम केलं आहे. त्यांनी ‘पंचक’, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’, ‘भाई, अरे..”, ‘देवा’, ‘गुलदस्ता’, ‘एबी आणि सीडी’, ‘बालगंधर्व’ यांसारख्या चित्रपटांत आणि ‘चार दिवस सासूचे’, ‘ललित २०५’, ‘असंभव’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ते ‘ठरलं तर मग’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.