Tu Hi Re Majha Mitwa New Promo : स्टार प्रवाहवरील ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत नुकताच अर्णव आणि लावण्याचा साखरपुडा पार पडला. अर्णवच्या मनाविरुद्ध हा साखरपुडा पार पडला आहे. अर्णवच्या मनात ईश्वरीविषयी प्रेम आहे; मात्र तो तिला तिच्या भावना सांगू न शकल्यामुळे आणि आजीच्या हट्टापायी त्याने लावण्याशी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला.
मालिकेत काही दिवसांपासून अर्णवला त्याच्या जिजूचा म्हणजेच राकेशचा संशय असल्याचे पाहायला मिळत होते आणि त्यांचा हा संशय खरा ठरला आहे. राकेश अंजलीची फसवणूक करत असल्याचं अर्णवला कळलं आहे. तो त्याला रंगेहात पकडतो आणि त्याचं सत्य सांगण्याची धमकीसुद्धा देतो. पण राकेश अर्णवला त्याच्या ताईची भीती घालतो. त्यामुळे आपल्या ताईच्या काळजीपोटी अर्णव राकेशचं सत्य सर्वांपासून लपवून ठेवत आहेत.
राकेशचं हे सत्य तो अंजली आणि घरच्यांना सांगू शकत नसला तरी तो राकेशबद्दल ईश्वरीला सांगणयाचा प्रयत्न करत आहे. ईश्वरी आणि राकेश यांचं लवकरच लग्न पार पडणार आहे; पण हे लग्न होऊ नये आणि राकेशची खरी बाजू ईश्वरीसमोर यावी यासाठी अर्णव प्रयत्न करत आहे. अशातच आता मालिकेच्या आगामी कथानकाचा एक प्रोमो समोर आला आहे.
या प्रोमोमध्ये अर्णव ईश्वरीला राकेशबरोबरच्या लग्नाला नकार दे असं म्हणतो. मात्र त्याचं हे बोलणं ईश्वरीचे बाबा ऐकतात आणि ते तिला बाबांच्या शब्दाचा मान राखायला हवा होतास असं म्हणतात. पुढे ते तिला हाताला धरून घेऊन जात असतानाच राकेशही तिचा दुसरा हात धरत थांबवण्याचा प्रयत्न करतो. यावर ईश्वरी अर्णवला हात सोडण्यास सांगते. पण अर्णव तिचा हात सोडत नसल्याने ईश्वरीचे बाबा त्याच्या कानाखाली मारतात. यानंतर ते आपल्या लेकीला घेऊन जातात.
‘तू ही रे माझा मितवा’ मालिका प्रोमो
येत्या ५ ऑगस्ट रोजी हा भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता ईश्वरी आणि राकेश यांचं लग्न होणार की नाही? अर्णव तिच्यासमोर राकेशचा खरा चेहरा अनू शकेल का नाही? हे येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.