Ruchira Jadhav Diet Plan : रुचिरा जाधव मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तू ही रे माझा मितवा’मध्ये खलनायिकेची भूमिका साकारत आहे. रुचिरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अभिनयाव्यतिरिक्त ती तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. अशातच आता तिने तिच्या डाएट प्लॅनची माहिती दिली आहे.

रुचिरा अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून फिटनेस रिलेटेड योगा, व्यायाम करतानाचे फोटो पोस्ट करीत असते. अशातच तिने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या डाएट प्लॅन आणि तिच्या फिटनेसच्या सीक्रेटबद्दलची माहिती दिली आहे. रुचिराने मुलाखतीत ती रोज सेटवर खाण्या-पिण्याच्या सर्व गोष्टी घेऊन जात असते आणि ती घरी आईनं बनवलेलं जेवणच जेवते, असे स्पष्ट केले आहे.

रुचिरा जाधवने सांगितलं तिचं फिटनेचसं सीक्रेट

रुचिरा तिच्या फिटनेस सीक्रेटबद्दल म्हणाली, “मी माझ्या आईच्या हातचं घरचं जेवण जेवते आणि हेच माझ्या फिटनेसचं सीक्रेट आहे.” रुचिरा पुढे तिच्या डाएटबद्दल म्हणाली, “मी शाकाहारी आहे. त्यामुळे जे मांस, मटन खात नाहीत, त्यांच्यासाठी भाजी-भाकरी, पनीर हाच पर्याय असतो आणि मी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेले तरी मला भाजी-भाकरी हवी असते. त्याबरोबर मी सलाडही खाते. त्याशिवाय मला जेवण जात नाही. मी जास्तीचं जेवण आणते. कारण- सेटवर आम्ही सगळे एकत्र बसून जेवतो.”

रुचिरा पुढे म्हणाली, “मी मढवरून मुलुंडला जाते. कारण- मला आईच्या हातचं जेवण जेवायचं असतं. म्हणून मी माझं घर सोडून, आई सोडून दुसरीकडे कुठेही राहत नाही.” रुचिरा पुढे म्हणाली, “मी रोज नारळपाणी पितेच. त्याबरोबर फळंही खाते. माझा सकाळचा नाश्ता भरपूर असतो. मी खूप खाते आणि ३-४ वाजण्याआधी एखादं फळ खाईन याची काळजी घेते.”

डाएट प्लॅनबद्दल रुचिरा पुढे म्हणाली, “जेव्हा मला कोणी डाएटबद्दल विचारतात ना तेव्हा मी हेच सांगते की, मी ठरवून खात नाही. मला जे खायचं असतं, ते खाते. डाएट ठरवून होत नाही. मी भाजी-भाकरीपण खाते आणि ओट्स वगैरे गोष्टीही खाते. मी चिया सीड्सही बरोबर ठेवते, जे मी पाण्यात टाकून पीत असते. मी पाण्यात कधी कधी तुळशीची पानंही टाकते, ते पाणी प्यायल्यानंतर खूप छान वाटतं. त्यानंतर आई मला मेथीचा लाडू बनवून देते. तो मी खाते. अंजीर, बदाम, अक्रोड हे सगळंही मी खात असते.”

‘हे’ आहेत रुचिरा जाधवचे आवडते पदार्थ

रुचिरा पुढे म्हणाली, “मला कॉफी प्यायला आवडते. सकाळी मी चहा पिते आणि संध्याकाळी कॉफी एवढंच. माझ्या घरी कॉफीचं कलेक्शन असतं. माझ्या ठरलेल्या गोष्टी आहेत की, कधी काय खायचं. मी योगा करते. योगामुळे मी त्यानुसार गोष्टी खात जाते. मी सगळं खाते; पण मी व्यायामही करते. अगदी सेटवरही व्यायाम करते. तुम्ही काय खाता, त्याचा तुमच्या त्वचेवर परिणाम होतो. कलाकार असल्यानं छान दिसणं भाग आहे. मी दहावीपासून योगा करतेय आणि भाजी-भाकरी असं घरचं जेवणच खात आलीये. त्यामुळे मला त्याची सवय आहे. मला इंद्रायणी भातही खूप आवडतो. माझ्या घरच्यांना आवडत नाही; पण माझ्यासाठी घरी तो बनवला जातो.”