Television Famouse Actress : छोटा पडदा हा प्रेक्षकांच्या मनोरंजनाचं एक महत्त्वाचं साधन आहे, त्यामुळे मालिका त्यांच्या दैनंदिन जीवनाचा घटक बनते. परंतु, मालिका म्हटलं की प्रामुख्याने डोळ्यांसमोर येतात ते नायक आणि नायिका. मात्र, यासह मालिकेत ज्या पात्रामुळे रंजक वळण येतं ते म्हणजे खलनायिकेचं पात्र. अशातच खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीने नुकतंच याबद्दल वक्तव्य केलं आहे.
‘स्टार प्रवाह’वरील ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेतून खलनायिकेची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री म्हणजे सुरभी भावे. सुरभीने एका मुलाखतीमध्ये खलनायिकेची भूमिका साकारतानाचा तिचा अनुभव सांगितला आहे. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिला “जे कलाकार ऑनस्क्रीन नकारात्मक भूमिका साकारतात, त्यांचा खऱ्या आयुष्यामध्ये स्वभाव खरंतर भूमिकेपेक्षा खूप वेगळा असतो; तर हा समतोल कसा साधला जातो”, असा प्रश्न विचारण्यात आलेला.
सुरभी भावे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाली, “खरंतर अशा भूमिका साकारताना खूप मज्जा येते, कारण खऱ्या आयुष्यात आम्ही तसं वागत नाही, त्यामुळे पडद्यावर त्या भूमिका साकारणं आव्हानात्मक असतं आणि टेलिव्हिजनवर खलनायिकेला खूपच मोठ्या प्रमाणात नकारात्मकदृष्ट्या दाखवलं जातं.”
सुरभी भावे पुढे म्हणाली, “सुरुवातीला मला नकारात्मक भूमिका साकारताना खूप त्रास व्हायचा. एका मालिकेत मी खलनायिकेच्या भूमिकेत असताना नायिकेच्या वडिलांना माझे पाय धरायला लावते आणि सांगते की, तुमच्यासारख्या लोकांना मी पायाशीपण ठेवत नाही वगैरे. त्यात माझ्यासाठी वडील हा खूप नाजूक विषय आहे. मी १४ वर्षांची असताना माझे वडील गेले, त्यामुळे तो सीन करताना मी तेव्हा ढसाढसा रडले.”
सुरभी पुढे याबाबत म्हणाली, “नंतर मला असं वाटलं की, नाही मला जे वाटतंय तो मी सुरभी म्हणून विचार करत आहे, पण मी जी भूमिका साकारत आहे तिला वाटत नाहीये ना तसं. तेव्हा मी दिग्दर्शकाशी चर्चा केली आणि म्हटलं की पाच मिनिट द्या कारण मी रडले होते, त्यामुळे मेकअप खराब झालेला. पण, नंतर त्या भूमिका साकरणं जमायला लागलं; मात्र सुरुवातीला तशा भूमिका साकारताना भयंकर त्रास व्हायचा.”
सुरभी पुढे यामागचं कारण सांगत म्हणाली, “कारण खऱ्या आयुष्यात इतकं वाईट कोण वागत नाही आणि बऱ्याचदा तर नायिकेची काहीही चूक नसताना तिच्याबरोबर खलनायिका वाईट वागते, असं मालिकेत का दाखवलं जातं मला कळत नाही.”