Abhijit Aamkar Shares Ishwari And Arnav Wedding Photos : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘तू ही रे माझा मितवा’ आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचली आहे. अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण अखेर मालिकेत आला आहे. नुकतंच ईश्वरी आणि अर्णव यांचं लग्न झालं आहे.
खरं तर या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं; मात्र योग्य वेळी त्यांनी आपलं प्रेम व्यक्त न केल्यानं दोघांची वेगळ्या व्यक्तींशी लग्न ठरली होती. अर्णव त्याच्या आजीच्या आग्रहामुळे लावण्याशी; तर घरच्यांमुळे ईश्वरी राकेशशी लग्न करणार होती. मात्र ही दोन्ही लग्नं होण्याआधी एक मोठा ट्विस्ट आला आणि अखेर अर्णव-ईश्वरी यांचंच लग्न झालं.
राकेश ईश्वरीला घेऊन गेलेल्या एका अज्ञात ठिकाणी पोलिसांची रेड पडते. तेव्हा ईश्वरीची बदनामी होऊ नये म्हणून अर्णव ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालत ती माझी पत्नी असल्याचं पोलिसांना सांगतो. नंतर ईश्वरीला पत्नी म्हणून स्वीकारत तो तिच्या आई-बाबांना सत्य परिस्थिती सांगतो. ईश्वरीच्या वडिलांनाही राकेशचं सत्य माहीत असल्यानं तेसुद्धा आपल्या मुलीचं योग्य व्यक्तीशी लग्न झाल्यानं त्यासाठी होकार देतात.
त्यानंतर मालिकेत अर्णव-ईश्वरी यांचं रीतीरिवाजांनुसार लग्न पार पडल्याचं पाहायला मिळालं. अशातच या लग्नाचे काही खास क्षण अर्णव म्हणजेच अभिनेता अभिजीत आमकरने शेअर केले आहेत. अभिजीत हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. सोशल मीडियाद्वारे तो त्याचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करताना दिसतो. अशातच त्यानं या लग्नसोहळ्याचे खास फोटो शेअर केले आहेत.
लग्नाचे फोटो शेअर करीत अभिजीत या पोस्टमध्ये असं म्हणतो, “माझ्या सगळ्या ‘IshNav’ आणि ‘तू ही रे माझा मितवा’ चाहत्यांच्या आग्रहास्तव… तुमच्यासाठी खास आमच्या लग्नाच्या काही सुंदर क्षणांची झलक. तुमच्या प्रेमासाठी आणि शुभेच्छांसाठी मनापासून आभार. तुमचं प्रेम फक्त कमेंट्समध्येच नाही, तर थेट टीआरपी चार्टवरही झळकतंय. असेच प्रेम करत राहा, आशीर्वाद देत राहा आणि आमच्या प्रवासात सोबत राहा.”
अभिजीत आमकर इन्स्टाग्राम पोस्ट
अभिजीतनं शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. “खूप छान! तुम्ही दोघं खूप सुंदर दिसत आहात”, “खूपच बढिया दिसत आहात तुम्ही दोघं”, “खऱ्या आयुष्यात किती गोड छान दिसता; मग मालिकेत का भांडता?”, “मिस्टर अँड मिसेस राजेशिर्के” या आणि अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी या पोस्टवर व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, अर्णव-ईश्वरी यांचं लग्न झालं असून, दोघांच्या सुखी संसारालाही आता सुरुवात झाली आहे. तू ही रे माझा मितवा ही मालिका रोज रात्री १०.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते.