Shivani Rangole presented a poem: अभिनेत्री शिवानी रांगोळे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून घराघरात पोहोचली. तिची अक्षरा ही भूमिका चांगलीच गाजली. अधिपती आणि अक्षरा यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर अभिनेत्री ‘कोहम’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आता सोशल मीडियावर तिने ‘कोहम’च्या निमित्ताने एक सुंदर कविता शेअर केली आहे.

शिवानी रांगोळेने सादर केली कविता

शिवानीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने स्वत: लिहिलेली एक कविता वाचून दाखवली. ओळख नावाची ही कविता आहे. त्या कवितेच्या ओळी पुढीलप्रमाणे-

माझी ओळख एकदा शोधू लागली, कधी आईच्या डोळ्यांत दिसणाऱ्या कौतुकात,
तर कधी आरशात दररोज बदलत जाणाऱ्या वास्तवात, कधी रोजनिशीच्या लपवलेल्या पानात
तर कधी फोटोत चेहऱ्यावर चिकटवलेल्या हास्यात…
मग कळलं की, शाळेतल्या एका बाकावर म्हणे माझी ओळख लपून बसलीये,
मामाच्या गावाला जाऊन रील करायचं राहून गेलं म्हणून जुन्याच काळात विसरल्यासारखी झालीये,
ती बुजलेली आहे म्हणे….
फक्त आजीजवळ बसून जात्यावर गाणं गाते, चुकून ट्रोल नको व्हायला म्हणून मनातल्या मनात व्यक्त होतेय,
तिला एकांतात खूश राहता येतं म्हणे, सतत सोशल मीडियाची खिडकी उघडत नाही; मात्र पक्षी आलेच कधी दारात, तर त्यांच्या भाषेत हसत-खेळत राहते…
तिला इतरांनी सतत आवडून घ्यावं, असं वाटत नाही म्हणे, तिचं तिच्यावरच खूप प्रेम आहे,
कोणी फॉलो बॅक केलं नाही तरी ती तिच्या वाटेवर चालत राहते…
ती खूप दिवस मला शोधत होती म्हणे,
माझ्या थेरपिस्टशी बोलली, अचानक कॉन्टॅक्ट झाला, माझीच ओळख मला नव्यानं भेटली.
तिला मी खूप प्रश्न विचारले म्हणे, तिनं उत्तर मात्र माझ्याच आवाजात दिली.
माझ्यासाठी रोज वेळ काढत जा ना, माझी ओळख मला उसासून म्हणाली.
प्रेरणा, ऊर्जा, शक्ती माझीच नावं आहेत म्हणे, तिनं माझ्या मनात रिपोस्ट केलं.
सोशल गर्दीत भरकटत जाण्याआधी तिनं मला वेळीच मला सावरलं.

नेटकरी काय म्हणाले?

शिवानी रांगोळेच्या या कवितेवर अनेक चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. “कविता खूप अर्थपूर्ण तर आहेच आणि खूप उत्तम सादरीकरण”, “खूप सुंदर कविता, शब्द, भावूक आवाज आणि सादरीकरण. अतिशय अर्थपूर्ण कविता. तू मला अक्षरा म्हणून खूप आवडत होतीस. आज तुझे हे नवे गुण समजले”, “किती छान शिवानी. तू आणि तुझ्या कविता दोन्ही”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, आगामी काळात अभिनेत्री कोणत्या माध्यमातून, प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.