Swapnil Rajshekhar Express Feeling About His Role: काही मालिका या दीर्घकाळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात, त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात मालिकेतील पात्रांविषयी तसेच कलाकारांविषयी आपुलकी निर्माण होते; त्यामुळे मालिका संपताना चाहते भावूक होत असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळते.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकाने गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या मालिकेतील मास्तरीणबाई व अधिपती या जोडीने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. अशिक्षित अधिपती व शिक्षक असलेली अक्षरा ही जोडी लोकप्रिय ठरली. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. या सगळ्यात अधिपतीची आई भुवनेश्वरी आणि वडील चारूहास यांच्यातील भांडणे, मतभेद यामुळेदेखील मालिका चांगलीच गाजली. आता या मालिकेने निरोप घेतला आहे.

अलविदा चारुहास सूर्यवंशी…

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी चारूहास ही भूमिका साकारली होती. मुलावर म्हणजेच अधिपतीवर खूप प्रेम असलेला, पण हातात सत्ता नसलेला, भुवनेश्वरीपुढे सतत हार मानावी लागणारा हतबल वडील अशा रुपात चारुहास दिसला. मात्र, त्याने त्याच्या सुनेची म्हणजेच अक्षराची कायम साथ दिली. त्याने भुवनेश्वरीचे कारस्थान यशस्वी होऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसला. आता अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी मालिका संपल्यानंतर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

स्वप्नील राजशेखर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रावर मालिकेतील काही सीनचे व्हिडीओ शेअर केले आहेत. हे व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले, “अलविदा चारुहास सूर्यवंशी. दोन वर्ष, सातशेहून जास्त एपिसोडस, उत्तम क्रिएटिव्ह टीम, चांगले सहकलाकार, छान प्रोडक्शन हाऊस, चांगली वाहिनी आणि मी यापूर्वी न केलेली भूमिका, हतबल, अगतिक, भरडला जाणारा प्रेमळ बाप; त्याला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. एक आनंददायी प्रवास काल संपला. आता नव्या भूमिकेत लवकरच येईन”, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

स्वप्नील राजशेखर यांनी शेअर केलेल्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले. एका नेटकऱ्याने लिहिले, “तुम्हाला नवीन भूमिकेत पाहण्यास उत्सुक आहोत.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “तुम्ही खूप उत्तम काम केले”, आणखी एका नेटकऱ्याने कौतुक करीत लिहिले, “या लूकमध्ये तुमच्या बाबांची छबी दिसली.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वप्नील राजशेखर यांनी आजपर्यंत अनेक भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता आगामी काळात ते कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.